“बाहा-एसएई इंडिया-२०” स्पर्धेत आकुर्डीच्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला विजेतेपद


आकुर्डी ( लोकमराठी) : महिंद्रा पुरस्कृत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एस ए इ) च्या वतीने म. प्रदेश पितमपूर येथे आयोजित केलेल्या “बाहा” राष्ट्रीय स्तरिय स्पर्धेत आकुर्डीच्या डॉ.डी वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम विजेतेपद मिळवले. शिवाय विजेतेपदासह विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गाडीस ८ पैकी ॲक्सलरेशन प्रथम क्रमांक , रफ्तार प्रथम क्रमांक , ड्यूरेबिलिटी व एन्ड्युरन्स या ५ प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक इतिहास रचला आहे. 

अशी माहिती ‘डी वाय पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी’ चे संचालक कर्नल एस. के. जोशी, प्राचार्य डॉ. विजय वाढई, उपप्राचार्य डॉ पी. मालती, विभागप्रमुख डॉ विनय कुलकर्णी, शिक्षक समन्वयक सुनील पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्राचार्य डॉ वाढई म्हणाले कि, ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी,या एटीव्हीचा सर्वच विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण मिळुन, सर्वच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी कशाप्रकारे फायदा होतो.”


कर्नल एस. के. जोशी पुढे म्हणाले की,”बाहा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ‘डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी’ च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. देशभरातील नामवंत १२० अभियांत्रिकी(आयआयटी,एन आयटी इ) महाविद्यालयांमधून आमच्या ‘डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी’ च्या विद्यार्थ्यांनी विजेतेपदासह इतर ५ प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. 


प्रिडीएटर्स या विजयी संघात साकेत राऊत (कप्तान), प्रणव खाटेकर (ड्रायव्हर मॅनेजर), अपूर्वा महिंद, सौरव इंगळे, तेजस धाकटे, विशाखा कोटकर, ऋग्वेद बोपर्डीकर, अंशुल गुप्ता, श्रीकांत नखाते, केविन भोसले, विपुल जाधव, पृथ्वीराज शिंदे, अलीअबू फर्जद, निल कापडी, प्रतीक बिराजदार, वेदान्त कुलकर्णी, मृणाल दौंडकर, मृणाल आरगडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.


त्यांचे हे यश महाविद्यालयाच्या इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल. ‘डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी’ ने नेहमीच या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत मुलांची चिकाटी, गुणवत्ता आणि कौशल्य यांचा कस लागतो आणि डीवाय पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने यशोशिखर गाठून आपला दर्जा सिद्ध केला आहे. “वर्षानुवर्षे या स्पर्धेची प्रसिद्धी वाढतच असून आजघडीला राष्ट्रीय स्तरावरील ही खूप मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते, या स्पर्धेने महाविद्यालयाच्या तरुण इंजिनीअर्स मध्ये प्रचंड आवड आणि वेड निर्माण केले आहे व आपली प्रतिभा आणि कौशल्य दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मोठे व्यासपीठ उभे केले आहे.

दरवर्षी देशभरातील अनेक महाविद्यालये राष्ट्रीय विजेतेपदासाठी या स्पर्धेत सहभागी होतात. नेहमीच या स्पर्धेवर ‘डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी’ चे वर्चस्व राहिले आहे. यावर्षी देखील “बाहा इंडिया २०२०” स्पर्धेत ‘डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी’ ने विजेतेपद पटकावून या स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. 

संस्थेचे चेअरमन नामदार सतेज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.