खराळवाडीतील तरूणीचा येरवड्यातील इमारतीखाली आढळला मृतदेह 

  • तरूणीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी 

पिंपरी : खराळवाडी येथील १७ वर्षीय तरुणी मंगळवारी (दि. १४ मार्च २०२३) रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. या तरूणाचा घातपात झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली किरण नढे यांनी येरवडा पोलीसांकडे केली आहे. 

याबाबत शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सेक्रेटरी स्वाती शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील खराळवाडी येथील तरुणी मंगळवारी रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह आईच्या ताब्यात दिला. 

त्यानंतर आज मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खराळवाडी येथे आणला असता नातेवाईकांनी संबंधित तरुणीवर अत्याचार करून तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

दरम्यान, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, प्रदेश सेक्रेटरी स्वाती शिंदे, काँग्रेसचे कार्यकर्ते व नातेवाईक यांनी येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पोलीसांनी यातील गुन्हेगारांना शोधण्याचे आश्वासन दिले. सध्या मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय ठेवण्यात आला आहे. 

Join WhatsApp Group
Exit mobile version