पठाणी वसुली करणारी ‘पे अँड पार्क’ योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

पठाणी वसुली करणारी 'पे अँड पार्क' योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी : शहरामधील महानगरपालिकेची पे अँड पार्क योजना तातडीने बंद करण्यात यावी. असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वाघ यांना आम आदमी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, महिला अध्यक्ष स्मिता पवार, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हागवणे, डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे आदी उपस्थित होते.

निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक त्रस्त असताना पिंपरी चिंचवडचे महापौर, पालिका सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिशाला कात्री लागणारी धोरणे राबविली गेली आहेत. भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला आहे, तरी देखील शहर वाशियांकडून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजपकडून सुरूच असल्याचे दिसते. भाजपने शहरात पार्किंग पॉलिसी राबवण्याचा खटाटोप चालू केला आहे. या पार्किंग पॉलिसीची १ जुलैपासून पिंपरी-चिंचवड महापालिका विभागा मार्फत अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांची विभागणी करून ती खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे, हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एकच आहे. ही पठाणी वसुलीच आहे.

याआधीच इंधन दरवाढ महागाईमुळे बेजार झालेल्या शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्यासाठी पैसे घेऊन एक प्रकारची लुटीचा डाव टाकलेला आहे. यासाठी शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, यामागे सत्ताधारी भाजपचा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचा व ठेकेदारांना मोठे करण्याचा डाव आहे. सध्या स्थितीत कोरोनाच्या भीषण संकटाला नागरिकांनी तोंड दिले आहे. नागरिकांन पुढे रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोणामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे व्यवसाय उद्योग धंदे अडचणीत आले आहेत, लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. त्या परिस्थितीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून वाहने उभी करण्यासाठी पैसे काढणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने पे अँड पार्क ही योजना बंद करावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन उभं करण्यात येईल, असा इशारा ही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.