मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी

श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एस. एम. जोशी (एस. एम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १२ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कोकणमधील रत्नागिरीजवळील ‘गोळप’ हे होय. त्यांचे (S M Joshi) शिक्षण बी.ए., एल.एल.बी., डी.लीट. असून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लीट या पदवीने त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मानित केले होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यात तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला वारंवार आला. अशा या तुरुंगवासातील दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासली. या दिवसांत कार्ल मार्क्सच्या विविध ग्रंथांचे वाचन, विविध साप्ताहिकांतील अग्रलेखांचे वाचन, गुजराती कादंबऱ्यांचे वाचन, मानवेंद्रनाथ रॉय यांचे ‘Tasks before us’ या पुस्तकाचे वाचन. इत्यादी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते.

याव्यतिरिक्त तुरुंगामधील आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांतून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडताना दिसते. म्हणूनच ते स्वतः आपल्या ‘मी एस.एम.’ या आत्मकथनातून म्हणतात की, ‘तुरुंग हे असे विद्यापीठ आहे, की ज्याच्यामुळे मी भारताचा ‘पूर्ण’ नागरिक झालो.’ महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, सेनापती बापट, गो. ग. आगरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी ते प्रेरित झालेले होते. त्यांचे मातृभाषा मराठीसहित हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेवरही उत्तमरीत्या प्रभुत्व होते.

त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम करत असताना अन्यायाला थारा दिला नाही. याचे कारण ते लहान असल्यापासूनच माणसामाणसांतली उच्चनीचतेची दरी, स्पृश्य-अस्पृश्यता त्यांच्या मनाला पटत नव्हती. त्यांना स्त्रियांवरील अन्याय दूर झाला पाहिजे, अस्पृश्यता पाळली जाऊ नये, पुनर्विवाहाला समाजाने मान्यता दिली पाहिजे. असे मनोमन वाटत असे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतूनही त्यांचा संपर्क दांडगा असल्यामुळे तेथील लोकांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यात ‘साने गुरुजी सेवा पथका’च्या निर्मितीमुळे त्यांची ग्रामीण भागातील युवकांशी घट्ट नाळ जुळलेली होती. यातून त्यांना पडलेले प्रश्न ते विधानसभेवर सदस्य असताना सरकारला विचारून धारेवर धरत. याविषयी त्यावेळचे महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे त्यांना म्हणतात, “एस.एम. तुम्ही इतके प्रश्न आणि तेही ग्रामीण भागातले- अगदी दुर्गम अशा खेड्यातले विचारता याचं मला आश्चर्यच वाटतं.” एस.एम. यांनी विधानसभेचे सदस्य असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाविषयी, किफायतशीर शेतीसाठी काही उपाय योजण्याची सरकारला वारंवार विनंतीही केली. यावरून असे दिसते की, त्यांना शेती आणि शेतीविषयक चांगली जाणीव होती. आजच्या घडीला प्रत्येक नेता हा स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतोय आणि ठोस कृती न करता, प्रश्नांवर चर्चा न करता, उपाय न योजता नुसती आश्वासने देऊन आम्ही कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनी एस. एम. जोशी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा.

एस. एम. जोशी यांनी विधानसभेचे व लोकसभेचे सदस्य असताना मिळालेल्या संधीचा कधी दुरुपयोग केला नाही. ‘उतणार नाही. मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही.’ असेच त्यांचे एकंदरीत वर्तन होते. म्हणूनच त्यांनी जनतेच्या मनात विशेषतः युवकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. ते उत्तम वक्तेही होते. त्यांची अनेक भाषणेही गाजली. त्यांच्या भाषणांचा श्रोत्यांवर प्रभाव पडत असे. प्रसिद्धीची त्यांना हाव नव्हती. ‘सत्याची जाहिरात करावी लागत नाही’ असे ते म्हणत. त्यांनी तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य सत्यासाठी व न्यायासाठीच वेचले. ‘राजकीय कार्य हे समाज परिवर्तनाचे साधन आहे’ अशी त्यांची भूमिका होती. एकूणच त्यांच्या कर्तृत्वावरून राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसतात.

एस.एम. जोशी यांचा प्रवास पाहता ते ‘युथ लीग’, मिठाचा सत्याग्रह, राष्ट्रीय सेवा दल यांतील त्यांचा असलेला सहभाग, समाजवादी पक्षाचे सदस्य, मुंबई राज्य विधानसभा सदस्य (१९५७), संसद सदस्य (१९६७) होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या झालेल्या चळवळीशी एस.एम.जोशी यांचे नाव कायमस्वरूपी निगडित झालेले आहे. एकूणच अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे, लोकशाही बळकट करण्यासाठी अहोरात्र झटणारे, समाज परिवर्तनासाठी धडपडणारे, युवकांना स्वातंत्र्यलढ्यात येण्याची प्रेरणा देणारे, वाचन संस्कृती जोपासणारे, शेतकरी व कामगार वर्ग यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, स्वतंत्र भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन पाहणारे श्रीधर महादेव जोशी अर्थातच ‘एस. एम.’ यांना आजच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी
डॉ. संदीप वाकडे,
एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे