तेरच्या प्राचीन बौद्धस्तुपाची प्रतिकृती पिंपळदरी येथे  उभारणे हीच  दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांना खरी आदरांजली ठरेल – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. १२ (लोकमराठी) – उस्मानाबाद मधील तेरणा नदीच्या किनारी तेर गावात झालेल्या उत्खननात सापडलेल्या प्राचीन  स्तुपाचे जतन झाले नाही त्यामुळे या स्तुपाची प्रतिकृती गडपिंपळदरी येथे  उभारण्याचे दिवंगत यशपाल सरवदे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी ५ एकर जमीन घेऊन हॉल ही उभारला आहे. जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी या जागेला भेट देतात. त्यामुळे तेर च्या प्राचीन बौद्ध स्तुपाची प्रतिकृती गडपिंपळदरी ( जिल्हा उस्मानाबाद) येथे उभारणे हीच खरी दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

उस्मानाबाद मधील  भारतीय दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत राहून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे खंदे  समर्थक नेते राहिलेले पँथर यशपाल सरवदे यांचे नुकतेच निधन झाले. रिपब्लिकन पक्षातर्फे दिवंगत पँथर यशपाल सरवदे यांची जाहीर श्रद्धांजली सभा उस्मानाबाद मधील भीमनगर क्रांतिचौक येथे  आयोजित करण्यात आली त्यावेळी  ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर सभाध्यक्ष आणि  रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ; रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे; राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम;भाजप चे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे; रिपाइं युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष रवी मळाले; महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अस्मिता पारवे;प्रा कमलाकर कांबळे; भालचंद्र कठारे; आशिष डावरे; तानाजी कदम ;बाळकृष्ण इंगळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पँथर दिवंगत यशपाल सरवदे यांच्या पत्नी सुषमाताई सरवदे; मुलगा प्रियदर्श ; मुली प्रेरणा; प्रीती आणि प्रगती असे सर्व शोकाकुल सरवदे परिवारजन उपस्थित होते. 

उस्मानाबाद च्या गडदेवदरी येथील पिंपळदरी येथे उभारण्यात येणाऱ्या बौद्धस्तुपस्थळी जाणारा रस्ता चांगला बनविण्यासाठी आपण शासनाला पत्र पाठवणार आहोत. येथील बौद्धस्तुप उभारण्याचे दिवंगत यशपाल सरवदे यांचे स्वप्न सर्वांनी मिळून पूर्ण केले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. दिवंगत यशपाल सरवदे यांच्या जुन्या आठवणींना ना.रामदास आठवले यांनी उजाळा दिला. कळंब मतदारसंघात दिवंगत यशपाल सरवदे यांना दोन वेळा पक्षाची विधानसभा निवडणूक लढण्याची उमेदवारी दिली होती मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. मात्र अभ्यास असणारे उत्कृष्ट वक्ते असणारे यशपाल सरवदे यांनी भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची गाडी आडवण्याचे त्यांनी केलेले आंदोलन मराठवाड्यातील लोकांच्या लक्षात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात यशपाल सरवदे यांनी भारतीय दलित पँथर च्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. त्यांनी नंतर स्थापन केलेल्या नागबोधी रिसर्च सेंटर पिंपळदरी येथे बौद्ध स्तूप प्रतिकृती उभारण्याच्या कामास आपण सर्वतोपरी सहकार्य करू तसेच उस्मानाबाद (धाराशीव) 
तुळजापूर येथील प्राचीन बौद्ध स्तूप लेणी यांचे उत्खनन करून जतन आणि संवर्धन करण्याच्या मागणीसाठी  भारतीय पुरातत्व खात्याला आपण पत्र पाठविणार असल्याचे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. अनेक वक्त्यांनी दिवंगत यशपाल सरवदे हे भारतीय दलित पँथर चे झुंजार पँथर होते असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्रद्धांजली सभेपुर्वी ना.रामदास आठवले यांनी दिवंगत यशपाल सरवदे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच पिंपळदरी गडदेवदारी
येथे नियोजित बौद्धस्तूप प्रतिकृती उभारण्याच्या जागी भेट देऊन तिथे बांधण्यात आलेल्या नागबोधी रिसर्च सेंटर च्या सभागृहाला ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन दिवंगत यशपाल सरवदे यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.