शिवजयंतीला लोहगडचा गणेश दरवाजा चोवीस तास उघडा ठेवा; शिवभक्तांची मागणी

मळवली, दि.७ (लोकमराठी) – शिवजयंती सारख्या राज्यव्यापी आनंद सोहळ्याच्या दिवशी लोहगड किल्ला चोवीस तास उघडा ठेवा; अशी तीव्र मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे येत्या १० मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रेमी मोठया संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यावर येत असतात आणि शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जातात. मावळ तालुक्यातील लोहगड हा किल्ला त्यापैकी एक. भक्कम तटबंदी, बुरुज, पाच दरवाजे यामुळे लोहाप्रमाणे मजबूत किल्ला अशी लोहगडची ओळख आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक तलाव, पाण्याच्या टाक्या, पुरातन शिवमंदीर आहे. तसेच, पायथ्याला भव्य शिवस्मारक साकारलेले आहे. लोहगडला जोडणारे सुस्थितीतील रस्ते, दळणवळणाच्या सोयी, निसर्गरम्य ठिकाण व हॉटेल व्यवसाय यामुळे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींचा लोहगडला येण्याचा कल वाढला आहे. शिवजयंतीला शिवप्रेमी आदल्या दिवशी रात्री शिवज्योत नेण्यासासाठी येतात. मात्र, लोहगडचा गणेश दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना गडावर जाता येत नाही, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये उद्वेग वाढतो आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांची निराशा होते. परिणामी, या ठिकाणी वाद-विवादासारखे प्रसंग ओढवतात.

शिवजयंती सारख्या राज्यव्यापी आनंद सोहळ्याच्या दिवशी लोहगड किल्ला चोवीस तास उघडा ठेवावा अशी तीव्र मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. तसेच, येणाऱ्या शिवप्रेमींसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इत्यादी सुविधा पुरातत्त्व विभागाने पुरवाव्यात. तसेच, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे या गडकोट किल्ल्यांवर येऊन शिवभक्त प्रेरणा घेऊन जात असतात. म्हणून शिवभक्तांना अशा प्रकारे मनमानी धोरणानुसार आडकाठी आणू शकत नाही. नाहीतर एके दिवशी याचा उद्रेक होईल असा इशारा मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे यांनी दिला.