मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

पुणे दि. १५ (लोकमराठी) – मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समलखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.

पाच आयामांवर लक्ष केंद्रीत करणार…
रा. स्व. संघाचे येत्या काळात सामाजिक परिवर्तनाच्या पाच आयामांमधील आपल्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य हे ते पाच आयाम आहेत. समाजहितैषी लोकांना सोबत घेवून समरसतेसाठी निरंतर प्रयत्न करणे, हे या कार्य योजनेचे उद्दिष्ट आहे. अस्पृश्यता समाजासाठी कलंक असून तो मिटविण्यासाठी संघ कटिबद्ध असल्याचे प्रा. जाधव यांनी आवर्जून सांगितले.

प्रा. जाधव म्हणाले की, पानिपत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून ३४ संघटनांचे १ हजार ४७४ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी संघाच्या कार्यस्थितीवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत देशभरात ४२ हजार ६१३ स्थानी ६८ हजार ६५१ शाखा सुरू आहेत. मागील वर्षी याच काळात ३७ हजार ९०३ स्थानी ६० हजार ११७ शाखा होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत संघ शाखांमध्ये सुमारे आठ हजारांनी वाढ झालेली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत देशभरात एकूण ३ हजार ६८५ एवढे संघ शिक्षा वर्ग पार पडले.

रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी यावेळी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २८ प्राथमिक वर्ग झाले. त्यात प्रांत स्तराचा एक – प्रथम वर्ष वर्ग व एक – द्वितीय वर्ष वर्ग आणि देशभरातील स्वयंसेवकांचा एकत्रित तृतीय वर्ष झाले. या विविध वर्गांमधून पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सहभागी स्वयंसेवकांची संख्या ३,३४१ एवढी आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६५ स्थानी ६८३ शाखा आहेत. प्रांतात पुणे, नाशिक आणि कोल्हापूर असे तीन विभाग असून १९२ विद्यार्थी शाखा, महाविद्यालयीन २३ शाखा, १२७ तरूण व्यवसायी व प्रौढांच्या १६९ शाखा आहेत. पुणे महानगरात ४९ नगर स्थानी २७२ शाखा आहेत. यामध्ये १११ शाखा बालांच्या, ४ महाविद्यालयीन तरूणांच्या ११५ विद्यार्थी तर ५४ तरूण व्यवसायी आणि १०३ प्रौढांच्या शाखा आहेत.
प्रांतात साप्ताहिक मिलनांची संख्या शहरी भागात ३७९ आणि ग्रामीण भागात १८२ अशी एकूण ५६१ एवढी आहे. सेवा कार्यांच्या संदर्भाने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण १ हजार ७२३ सेवा वस्ती आहेत. सेवा वस्तीतच शाखा सुरू आहेत, अशा शाखा युक्त सेवा वस्तींची संख्या ६४ आहे. संघ स्वयंसेवकांच्या वतीने नित्य सेवा कार्य सुरू आहेत, अशा सेवाकार्ययुक्त ३४५ वस्ती असल्याचेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.


तसेच शाखांनी आपापल्या परिसराचे सामाजिक अध्ययन करून तिथे परिवर्तनाला गती द्यायला हवी आणि अशा सामाजिक परिवर्तनात सामाजिक समरसता, परिवार प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण या गतिविधी कार्यरत आहेत, असेही डॉ. दबडघाव म्हणाले.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त आणि भगवान महावीर यांच्या २५५० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रा. स्व. संघाच्यावतीने विविध उपक्रम आयोजिले आहेत. समाजाला शेकडो वर्षांच्या दास्यत्वाच्या मानसिकतेतून मुक्त करून समाजात आत्मविश्वास व आत्मगौरवाची भावना जागी करणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यंदा हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५०वे वर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भगवान महावीरांच्या शिकवणुकीचे आचरण आवश्यक
उपभोगवादी जीवनशैलीत पर्यावरणाचा ऱ्हास वाचविण्यासाठी अधिक अपरिग्रह संकल्पना आचरणात आणली पाहिजे. अहिंसेचे पालन करायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असा विश्वास आहे, की या प्रवासात समकालीन युगाला या मार्गावर पुढे जाण्यासाठी वर्धमान महावीर यांच्या शिकवणुकीची गरज आहे. हे वर्ष भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या (२५५०) वे निर्वाण वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर देशभर त्यांच्या विचार प्रसाराच्या कार्यक्रमात स्वयंसेवक योगदान देणार आहेत.

महर्षि दयानंद सरस्वती यांची २०० वे जयंती वर्ष
आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांचे २०० वी जयंती ( फेब्रुवारी २०२४ पासून) वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. ‘वेदांकडे परत चला’ ही त्यांची प्रमुख घोषणा होती. स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणा, जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण व पुनरोत्थान क्षेत्रात त्यांनी मौलिक व पथदर्शी कार्य केले. त्यानिमित्ताने देखील त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
वरील अभिवादनाचे कार्यक्रम सर्व समाजानेही आयोजित करावेत आणि स्वयंसेवकांनी सर्व शक्तिनिशी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील पारीत प्रस्ताव
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे विचारपूर्वक बनलेले हे मत आहे की, विश्वकल्याणाचे उदात्त लक्ष्य साकार करण्यासाठी भारताच्या ‘स्व’चा सुदीर्घ प्रवास आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणेचा स्रोत ठरला आहे. परकीय आक्रमणे तसेच संघर्षाच्या काळात भारतीय जनजीवन विस्कळीत झाले तसेच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांवर खोलवर आघात झाला. या कालखंडात पूज्य संत आणि महापुरुषांच्या नेतृत्वात संपूर्ण समाजाने सतत संघर्षरत राहून आपले ‘स्व’ टिकवून ठेवले. या संग्रामाची प्रेरणा स्वधर्म, स्वदेशी आणि स्वराज्य या ‘स्व’च्या त्रिसूत्रीत सामावलेली होती. तिच्यात संपूर्ण समाज सहभागी झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र प्रसंगी संपूर्ण राष्ट्राने या संघर्षात योगदान देणाऱ्या जननायक, स्वातंत्र्य सेनानी आणि महापुरुषांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून समोर येत आहे. भारताच्या सनातन मूल्यांवर आधारित नवोत्थानाचा जग स्वीकार करत आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेवर आधारित विश्वशांती, विश्वबंधुत्व आणि मानव कल्याणासाठी भारत आपली भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे हे मत आहे, की सुसंघटित, विजयी आणि समृद्ध राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेत समाजातील सर्व वर्गांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांगीण विकासाच्या संधी, तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण उपयोग आणि पर्यावरणपूरक विकास यांच्यासह आधुनिकीकरणाच्या भारतीय संकल्पनेच्या आधारावर नवी उदाहरणे घडविणे यांसारखी आव्हाने पार करावी लागतील. राष्ट्राच्या नवोत्थानासाठी आपल्याला कुटुंब संस्थेचे बळकटीकरण, बंधुतेवर आधारित समरस समाजाची निर्मिती तसेच स्वदेशी भावनेने उद्यमतेचा विकास आदी उद्देश गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या दृष्टीने समाजातील सर्व घटकांना, विशेषतः युवा वर्गाला सामावून घेण्याची आवश्यकता आहे.

संघर्षाच्या काळात परकीय शासनापासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या प्रकारे त्याग आणि बलिदानाची आवश्यकता होती, त्याच प्रकारे वर्तमान काळात हे लक्ष्य गाठण्यासाठी नागरिक कर्तव्यांप्रती कटिबद्ध तसेच वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त समाजजीवनसुद्धा घडवावे लागेल. या संदर्भात मा. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या ‘पंच-प्रणा’चे आवाहन महत्त्वाचे आहे.

अनेक देश भारताबद्दल सन्मान आणि सद्भाव बाळगतात, मात्र दुसरीकडे भारताचे हे ‘स्व’ आधारित पुनरुत्थान जगातील अनेक शक्ती सहन करू शकत नाहीयेत, हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अधोरेखित करायचे आहे. हिंदुत्वाच्या विचाराला विरोध करणाऱ्या देशातील तसेच बाहेरील अनेक शक्ती हितसंबंध आणि भेदांना पुढे आणून समाजात परस्पर अविश्वास, व्यवस्थेबद्दल अनास्था आणि अराजकता निर्माण करण्यासाठी नवनवीन कारस्थाने रचत आहेत. आपल्याला या सर्वांबद्दल जागृत राहून त्यांचे मनसुबेही अयशस्वी करावे लागतील.

हा अमृतकाळ आपल्याला भारताला वैश्विक नेतृत्व प्राप्त करून देण्यासाठी सामूहिक उद्यम करण्याची संधी देत आहे. भारतीय चिंतनाच्या संदर्भात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, लोकतांत्रिक, न्यायिक संस्थांसहित समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कालसुसंगत व्यवस्था विकसित करण्याच्या या कार्यात संपूर्ण शक्तीने सहभागी व्हावे, जेणेकरून भारत जागतिक पातळीवर समर्थ, वैभवसंपन्न आणि विश्वकल्याणकारक राष्ट्राच्या स्वरूपात उचित स्थान प्राप्त करू शकेल, असे आवाहन अखिल भारतीय प्रतिनिधी सभा प्रबुद्ध घटकांसहित संपूर्ण समाजाला करते.

Join WhatsApp Group
Exit mobile version