पीएमपीएमएल नवीन बस मार्गांमुळे रोजगारात वाढ होईल : आ. महेश लांडगे

पिंपरी : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरी बीआरटी बस स्थानकातून खेड तालुक्यातील कडूस आणि दावडी या ग्रामीण भागात दोन नवीन बसमार्ग सुरु करण्यात आले आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत रोजगारासाठी येणा-या नागरिक व विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. तसेच या ग्रामीण भागातील रोजगारात आणि नागरिकांच्या अर्थाजनातही पीएमपीएमएलच्या नवीन मार्गांमुळे वाढ होईल असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
        
शनिवारी (दि. २ एप्रिल) गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसरीतील बीआरटी बस स्थानकातून भोसरी ते दावडी (मार्ग क्र. ३७०) आणि भोसरी ते कडूस (मार्ग क्र. ३७१) या दोन नवीन मार्गांचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, ज्येष्ठ नेते पांडूरंग गवळी, युवा नेते योगेश लांडगे, योगेश लोंढे, वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपनवर तसेच पीएमपीएमएलचे सुनिल दिवाणजी, दत्तात्रय झेंडे, सतिश गव्हाणे, संतोष किरवे, शांताराम वाघेरे, काळूराम लांडगे, कुंदन काळे, गणेश गवळी व भोसरी ग्रामस्थ आणि प्रवाशी उपस्थित होते.
      
बस मार्ग क्र. ३७० भोसरी ते दावडी गावचे अंतर ४०.५० कि.मी. आहे. कुरुळी फाटा, चाकण मार्केट यार्ड, वाकी खुर्द, रोहकल फाटा, शिरोली, कडूस फाटा, राजगुरुनगर महाविद्यालय, होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडीगाव असा मार्ग असणार आहे. भोसरीतून दावडीसाठी पहिली बस सकाळी ६.१० मिनिटांनी आणि शेवटची बस सायंकाळी ६.२० मिनिटांनी सुटणार आहे. तर दावडीतून पहिली बस सकाळी ७.५० आणि शेवटची बस रात्री ८.१० मिनिटांनी सुटणार आहे.
    
बस मार्ग क्र. ३७१ भोसरी ते कडूसचे अंतर ३९.५० कि.मी. आहे. चाकण, शिरोली, टोल नाका, कडूस फाटा, म. गांधी विद्यालय खेड, अमूल डेअरी चांदोली रोड, वडगाव पाटोळे, दोंदे गाव, कडूस एसटी स्थानक, भैरवनाथ मंदीर, कडूस असा मार्ग असणार आहे. भोसरी येथून कडूससाठी पहिली बस सकाळी ५.१५ मिनिटांनी तर शेवटची बस दुपारी २.४५ मिनिटांनी सुटणार आहे. कडूसहून पहिली बस सकाळी ७ वाजता तर शेवटची बस दुपारी ४.३० मिनिटांनी सुटणार आहे. अशी माहिती पीएमपीएमएल व्यवस्थापनाने दिली आहे.

Recent Posts