
पिंपरी, दि. २ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) मधील प्रत्येक मजल्यावर रूग्णांच्या नातेवाईकांना बसण्यास खुर्च्यांची व्यवस्था करावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत नढे (Sayali Nadhe) यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यावेळी स्वाती शिंदे, निर्मला खैरे, वैशाली दमवाणी, आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय वैद्यकीय महाविद्यालय (YCM Hospital) येथे शहरासह शेजारील उपनगरातून रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही आलेले असतात. हे नातेवाईक प्रत्येक मजल्यावरील वरांड्यात व पायऱ्यांवर बसलेले असतात. येथे कोणत्याही प्रकारची बसण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नातेवाईकांची गैरसोय होत आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांनाही अडचणी निर्माण होते. या बाबीचा विचार करून प्रत्येक मजल्यावर नातेवाईकांना बसण्यासाठी खुर्च्यांची तसेच प्रत्येक वॉर्डात रूग्णांजवळ नातेवाईकांना बसण्यास स्टुलची व्यवस्था करण्यात यावी.