
मळवली, दि.११ (लोकमराठी) – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड पायथ्याच्या शिवस्मारकावर दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मंचाच्या कार्यकर्त्यांनी सुंदर फुलमाळांनी, रांगोळ्यांनी व भगव्या पडद्यांनी शिवस्मारक सजावट केली होती. दीपोत्सवात हजारो दिव्यांच्या लखलखाटात शिवस्मारक उजळून निघाले होते. शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवघोषणांनी गडपरिसर दुमदुमून गेला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शिवभक्त शिवजयंतीच्या आदल्या दिवशी लोहगडवरून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. सर्व शिवमंडळांनी शिवस्मारकावरून ज्योत प्रज्वलित करून महाराजांचा जयघोष केला. मंचाच्या वतीने आलेल्या शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सर्वांची मंचाच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवस्मारकवर प्रखर दिव्यांची व्यवस्था करण्यासाठी लोणावळा पोलीस ठाणे अंमलदार श्री कवडे साहेबांनी सहकार्य केले. शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, चेतन जोशी, सचिन निंबाळकर,संदीप भालेकर,प्रथमेश निंबळे,निलेश भोसले,अशोक भोसले,सचिन आमले,बाळू ढाकोळ, अजय मयेकर, संदीप गाडे, बसप्पा भंडारी, अमोल गोरे, आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.