
चाकण, दि.११ (लोकमराठी) – घराबाहेर खेळता खेळता अपहरण झालेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याची सुटका करण्यास अखेर चाकण पोलिसांना यश आले आहे. हि घटना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी आगरवाडी रोड , चाकण येथे घडली होती.
पारख उमेश सुर्यवंशी असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव होते. याप्रकऱणी चाकण पोलिसांनी सुरेश उर्फ सुऱ्या लक्ष्मण वाघमारे (वय ४५ रा. चाकण) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घराजवळ खेळणाऱ्या पारखचे अपहरण केले. पोलिसांनी यासाठी परिसरातील तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी सुऱ्या नामक फिरस्था त्याला घेवून जात असल्याचे समजले पण पोलिसांना आरोपी बाबात इतर काही माहिती मिळत नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुलांचे व संशयित आरोपीचे फोटे समाज माध्यमावर टाकले, तसेच त्याचे पोस्टर बनवून आसपासच्या परिसरात चिटकवले.
पोलिसांनी लोणावळापर्यंत मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी १० मार्च रोजी पोलिसांना मावळातील वेहरगाव येथील पोलीस पाटील अनिल पडवळ यांचा फोन आला की, पत्रकावर असणारा मुलाला घेऊन एक फिरस्थी कार्ला येथे फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने जाऊन पारख याला आरोपीच्या ताब्यातून सोडवून घेतले. पारख सध्या सुखरूप असून पालकांच्या ताब्यात त्याला चाकण पोलिसांनी दिले आहे.आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हा मुलगा जवळपास महिनाभर या आरोपीकडे होता. आरोपीला दारूचे व्यसन होते. तो कार्ला येथेही भीक मागूनच उदरनिर्वाह भागवत होता. मात्र आश्चर्य म्हणजे त्याने या काळात कोणती खंडणीची मागणी केली नाही की मुलाला भीक मागायला लावले नाही, मात्र त्याने हे अपहरण का केले होते हे स्पष्ट झालेले नाही.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पोलीस हवालदार राजू जाधव, संदिप सोनवणे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, निखील शेटे, भैरोबा यादव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन गंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.