पानिपत येथील मराठा स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार :विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पानिपत (हरियाणा) : पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करून विशेष प्रयत्न करण्याची घोषणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. यावेळी १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून आज पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी तिथल्या समस्या जाणून घेतल्या.

यानंतर पानिपत येथे शासकीय विश्रामगृहावर याबाबत येथील स्थानिक शासकीय अधिकारीवर्ग आणि रोड मराठा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत आज त्यांनी बैठक घेतली.

मराठा स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता विशेष प्रयत्न करण्याची सूचना यावेळी स्थानिक प्रशासनाला करण्यात आली. या कामासाठी शासकीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीतून,जिल्हा नियोजन अथवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकास कामांचे नियोजन करता येईल का याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पानिपत स्थानिक अधिकारी यांना दिल्या. स्थानिक जिल्हा प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारकडून याकरिता प्रयत्न होण्याची आवश्यकता यावेळी त्यांनी व्यक्त केली. याबाबत आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

पानिपत स्मारक परिसरात काही अत्यावश्यक सुविधा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत स्मारकाची दैनंदिन व्यवस्था चोख असण्याची गरज यावेळी व्यक्त झाली. या स्मारकाला भेट देणारे पर्यटक संख्या प्रत्येक वर्षी १ लाख पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या व स्मारकाच्या सुरक्षतेसाठी सुरक्षारक्षक म्हणून होम गार्ड यांची नेमणूक करणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, स्वच्छता राखणे, तसेच स्मारकामध्ये सीसीटीव्हीची सुविधाही आवश्यक असून प्रकाश योजना असलेला लाईट शो हवा, रात्रीच्या वेळी कर्मचारी हवे, हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे साठी सुसज्ज कॅन्टीन हवे. युद्धाची आणि इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय या स्मारकाशेजारी उभारावे, ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पुस्तकांचे वाचनालय – लायब्ररी, पर्यटकांसाठी प्रशिक्षित गाईड सुविधा उपलब्ध करून देणे अशा सुविधांची मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी हरियाणा रोड मराठा संघटनेचे गुरदयाल सिंग,झिले सिंग,राजेशकुमार चोपडा, बळबिर सिंग कल्याण,भीम सिंग, रामणारायन मराठा, मराठा राजेंद्र शेरा, कमलजीत महाले, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, हरियाणा, मुलतानसिंग महाले, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांचे खाजगी सचिव महेंद्र काज, पानिपतचे दंडाधिकारी राजेशकुमार सोनी, पुरातत्व खात्याचे अधिकारी वेदप्रकाश, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, विधानपरिषद उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, योगेश जाधव, प्रवीण सोनावणे, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts