कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो : प्रवीण तरडे

  • महासिनेमा‘’सरसेनापती हंबीरराव’ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, पुणे, ता. ३० मे २०२२ : कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो. त्याने समाजाचं देणं फेडलंच पाहिजे, असे प्रतिपादन “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य कलाकार प्रविण तरडे यांनी केले. सोमवारी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण तरडे बोलत होते. यावेळी कलाकार रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर आदी उपस्थित होते.

यावेळी तरडे म्हणाले की, मराठी चित्रपटात यापूर्वी नटाला कधी एन्ट्री अशी मिळालीच नाही. पण हंबीरराव मध्ये एन्ट्रीलाच टाळ्या, शिट्या मिळत आहेत. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे भव्यता आणि दिव्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती करण्यासाठी अनेक अभिनेते शोधले, पण प्रत्येकात काहीतरी उणिवा जाणवत होत्या. यानंतर निर्मात्यांनी माझ्या नावाला पसंती दिल्यावर मी प्रयत्नपूर्वक एक वर्षात ९८ किलो वरून ७६ किलो पर्यंत वजन घटवले. घोडेस्वारी, तलवारबाजी शिकलो, शरीरयष्टी कमवली. व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे हंबीरराव साकारता आला. या चित्रपटात हंबीरराव बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सोयराबाई या सर्वांच्या भूमिका उत्कृष्ट झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या महाचित्रपटाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे भव्यता आणि दिव्यता आहे. एकाच टाईपचा सिनेमा पुन्हा कधी साकारायचा नाही, हे मी मनाशी पक्के केले आहे.


त्यामुळे मुळशी पॅटर्न नंतर अनेक निर्मात्यांची मागणी असतानाही त्या पद्धतीचा चित्रपट मी परत केला नाही, त्यानंतर देखील अनेक निर्माते माझ्याकडे आले. पुन्हा तेच विषय करायचे नाही. कोणत्याही मोहाला बळी पडायचे नाही आणि कुठलेतरी अवॉर्ड मिळवण्यासाठी सिनेमा करायचा नाही. माझ्या दृष्टीने सिनेमा हा व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे. खूप लोकांनी पाहिला पाहिजे. चित्रपट बनवतानाच मी वेगळे आणि भव्य विषय घेऊन चित्रपट बनवला. त्यामुळे मला प्राईम टाईमसाठी कधी झगडावे लागले नाही. उलट मोठ्या कलाकारांचे चित्रपट उतरुन माझा चित्रपट लावण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मी व्यवसायाने शेतकरी आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात शेती हा विषय घेतला आहे. सिनेमा ही माझी आवड आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या कार्यकालात सरसेनापतीपद भूषविणाऱ्या हंबीरराव मोहिते यांचा इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सेनापती हंबीरराव यांच्या सारखी नररत्ने समजून घ्यायची असतील, तर महाराष्ट्रातील प्रत्येक आबालवृद्धांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला पाहिजे, असे आवाहन प्रविण तरडे यांनी यावेळी केले.

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाला पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक औरंगाबाद या प्रमुख शहारांसह संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी बालगोपाळांपासून ते ऐंशी, नव्वदीच्या वृद्धांपर्यंत सर्वजण प्रचंड उत्साहात चित्रपटगृहात गर्दी करीत आहेत. “परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट”, “युद्धात झालेल्या जखमेइतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे” अशा पध्दतीचे अनेक भारदस्त संवाद आणि स्फूर्ती देणारे लढाईचे प्रसंग आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेले अतुलनीय शौर्य यात पाहायला मिळणार आहे. महेश लिमये यांच्या नेत्रदीपक छायांकनामुळे महाराष्ट्राचा महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जातो.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशी दुहेरी भूमिका गश्मीर महाजनी याने साकारली आहे. “आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा” असा हुंकार देणारे सरसेनापती हंबीरराव ही मुख्य भूमिका प्रविण तरडे यांनी साकारली आहे. मोहन जोशी, उपेंद्र लिमये, राकेश बापट, श्रुती मराठे, स्नेहल तरडे,सुनील पालवाल, किरण यज्ञोपवीत, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, जयेश संघवी, शुभंकर एकबोटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात बघायला मिळणार आहे. आर्या रमेश परदेशी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

“सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत असून गीतकार प्रणित कुलकर्णी यांच्या गीतांना कैलाश खेर, आनंद शिंदे, नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह निर्माता रमेश परदेशी असून साहस दुश्ये प्रद्युम्न कुमार उर्फ पीके मास्टर यांची आहेत. पार्श्वसंगीत अविनाश विश्वजित, संकलन मयूर हरदास, कला दिग्दर्शन मदन माने, वेशभूषा मानसी अत्तरदे, पोशाख आणि शस्त्र व्यवस्थापन गणेश लोणारी व विनोद वणवे, रंगभूषा महेश बराटे, केशभूषा ज्योती सोनावणे, कार्यकारी निर्माता विशाल चांदणे आहेत. २७ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेला संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसादात सुरु आहे.

Recent Posts