प्रशांत शितोळेंचा पक्षाकडूनच घात, कार्याध्यक्षपदाचाही तडकाफडकी राजीनामा

एबी फॉर्म जोडला नसल्याने अर्ज ठरला बाद
पक्षाने खेळी केल्याचा होतोय आरोप

पिंपरी (लोकमराठी ) : चिंचवड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी बाद ठरल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी तडकाफडकी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद केल्याची माहिती समोर आली आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे यांना मैदानात उतरविले होते. पक्षाने त्यांना उमेदवारी देखील दिली होती. काल त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज छानणीत त्यांचा अर्ज बाद ठरला. अर्जासोबत पक्षाने एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीकडून बळीचा बकरा केल्याने नाराज झालेले प्रशांत शितोळे यांनी तडकाफडकी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचेही समजते.