राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘खानावळ’ आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे 'खानावळ' आंदोलन
  • महापालिका आयुक्तांच्या निषेधार्थ प्रवेशद्वारावर नगरसेवकांचा भोजन समारंभ
  • पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची पालिकेत केली होती व्यवस्था

पिंपरी (लोकमराठी ) :पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची व्यवस्था गेल्या आठवड्यात महापालिका भवनात केली होती. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. ५) दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ‘आयुक्तांची खानावळ’ आंदोलन केले.

शहरातील प्रस्तावित व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गेल्या आठवड्यात महापालिकेत आले होते. त्या वेळी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी आयुक्तांच्या दालनात भोजन केले. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला व आयुक्तांच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी एक वाजता महापालिका प्रवेशद्वारावर ‘खानावळ’ आंदोलन केले. बिर्याणी व आमटी असा बेत होता. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह विरोधी पक्ष नेते नाना काटे, नगरसेवक प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर, पंकज भालेकर, मयूर कलाटे, नगरसेविका सुलक्षणा धर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, नगरसेवकांसाठी आयुक्तांच्या दालनात भोजनाची परवानगी मिळावी, अशी मागणी साने यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने प्रवेशद्वारावर आंदोलन केले. ते सुरू असताना महापौर राहुल जाधव महापालिका भवनात आले. त्यांनाही भोजनाचा आस्वाद घेण्याचा आग्रह काटे व साने यांनी केला. त्यावर, ‘आयुक्तांच्या कक्षात आंदोलन करा, मग जेवण करतो’ असा उपरोधिक टोला मारून महापौर त्यांच्या दालनाकडे निघून गेले.