पिंपरी (लोक मराठी) : मतदान प्रक्रियेला सोमवारी सकाळी सातपासून सुरुवात झाली. मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. येथे अनेक बूथ तयार केले होते. परंतु, ‘सखी बूथ’ हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दरम्यान भोसरी सखी केंद्रात सकाळी अकरा पर्यत 11.72, चिंचवड मध्ये 16.5 टक्के तर पिंपरीतील १४१ जणांनी मतदान केले.
शहरात तीन सखी मतदार केंद्र तयार केली होती. या बूथबाहेर फुगे लावले होते. जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेवण्यात आला होता. स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे या शाळेत येणारा प्रत्येक मतदार सखी बूथच्या परिसरात काही क्षण थांबून पुढे जात होता. मतदानासाठी बूथमध्ये जाताना दरवाजातच महिलांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. प्रत्येक महिला ‘यंदा काय विशेष?’ असे महिला कर्मचाऱ्यास विचारात होत्या. यंदा निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सखी बूथ तयार करण्यात आला असून महिलांसाठी विशेष सेवा असल्याचे सांगण्यात आले. हे सांगितल्यावर अनेक महिलांच्या चेहऱ्यावर एक समाधान पाहण्यास मिळत होते. या अनोख्या उपक्रमाचे महिला वर्गाकडूनही स्वागत करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या मतदारासह वेगळाच अनुभव या सखी मतदान केंद्रांच्या माध्यमातून आला.
महिला अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व महिलांनी गुलाबी रंगाची एकसारख्या साड्या परिधान केल्या होत्या. अधिकारी वर्गाकडून प्रत्येक मतदाराची देखील प्रत्येक क्षणाला विचारपूस केल्याचे पाहून बरे वाटले, असे मत अनेक महिला मतदारांनी व्यक्त केले. दरम्यान, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि आपली लोकशाही बळकट करावी, असे आवाहन महिला मतदार करताना दिसत होत्या. त्यामुळे सखी मतदार केंद्र महिला मतदारांसाठी लक्षवेधक ठरली..