सामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणारा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी – डॉ. सदानंद मोरे

सामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणारा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी - डॉ. सदानंद मोरे

पिंपरी (लोकमराठी) : महाभारतातील दहाव्या अध्यायात सांगितलेल्या विभुतीयोगाव्दारे श्रीकृष्णाने देव-दानवामधील दिव्यत्व अधोरेखित केले आहे. संतांनी देखील ‘देव्यत्वाची जेथे प्रचित, तेथे कर माझे जुळती’ असा पाठ दिला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणा-या सर्वसामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणाराच आहे. त्यामुळे हा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवड येथे आज व्यक्त केले.

शब्द पब्लिसीटीच्या वतीने नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाच्या सहकार्याने देण्यात येणा-या प्राई़ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे आणि खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी डॉ. मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शब्द पब्लिसीटीचे शिवाजी घोडे आणि नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव उपस्थित होते. यावेळी कृष्णकुमार गोयल, नीरज दिपक कुदळे, सनदी लेखापाल विवेक लाहोटी, डॉ. प्रकाश जाधवर, स्वकाम संस्थेचे अध्यक्ष सुनील तापकीर, मकरज्योती ग्रुपचे एम.डी. राजशेखरन् पिल्ले, पी.के. इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रमेश सोनवणे, तेज कुरिअरचे संचालक रामचंद्र बुडानिया आणि मनोहर पाटील, श्रीनिवास राठी, आशिष देशमुख,बांधकाम व्यावसायिक सुनील आगरवाल, निशिता घाटगे, अरुण चाबुकस्वार, सुरेश कंक या मान्यवरांचा साहित्य, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राई़ड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शब्द पब्लिसिटी निर्मित धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना पुढे म्हणाले कि, “हल्ली ऑनलाईन वाचनाकडे कल वाढला आहे. वाचनाला पर्याय नाही. मात्र प्रत्यक्ष पुस्तके वाचनाकडे वाचनाकडे कल वाढेल.आणि वाचनसंस्कृतीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.”

डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, “शंभर कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात लोकशाही प्रक्रीया कशी नांदते याचे पाश्चात्य देशवासीयांना आश्चर्य वाटते. परंतु, याच सर्व श्रेय भारतातील सर्व सामान्य नागरिक आणि कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करून वाटचाल करणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनाच जाते. पिंपरी-चिचवडची वाटचाल ग्राम पंचायतीपासून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका इथपर्यंत झाली असून हा प्रवास टप्प्या-टप्प्याने झाला आहे. विकासाच्या या प्रवासात विविध क्षेत्रात निष्ठा आणि समर्पित भावनेने काम करणा-या व्यक्तींचे योगदान आहे. प्रचंड ध्येयवादाने प्रेरित आणि अथक परिश्रमाने आपले ध्येय गाठणा-या अशा आदर्श व्यक्तींना समाजापुढे आणून सकारात्मकता पेरली गेली पाहिजे.”

यावेळी बोलताना खासदार अमर साबळे म्हणाले की, “व्यक्तीगत आणि व्यावसायिक स्तरावर सामाजिक बांधीलकी महत्त्वाची आहे, ती जोपासली गेल्यास इतर समव्यावसायिकांपेक्षा आपण नक्कीच उजवे ठरतो. व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्तरावर उपभोगत असलेले भौतिक समाधान हे तात्कालीक असते. परंतु, आध्यात्मिक आणि आत्मिक समाधान लाभण्यासाठी सामाजिक भान बाळगणे गरजेचे आहे. पत्रकारिता हे धुलाई केंद्र बनले असले तरी ते दिशाहीताचे आहे.हल्ली वृतपत्रांच्या तर्फे सदगुणी व्यक्तींचा गौरव केला जात असल्याने मीडिया हे गौरव केंद्र देखील बनले आहे.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले की, “तरूणांनी स्वप्न पाहण्याची हिंमत करून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. स्वप्न पाहिली की, ती पूर्ण होतात हा माझा स्वानुभव आहे. ज्या शाळेत मी शिकलो आणि ज्या बॅंकेत मी खाते त्या शाळेचा मी आज अध्यक्ष आहे, तर त्या बॅंकेचा संचालकही आहे. यशाचे शिखर गाठल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवून आपली वाटचाल किती खडतर परिस्थितीतून झाली आहे, याची खूणगाठ कायम मनाशी बळगली पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्द पब्लिसीटीचे शिवाजी घोडे यांनी केले. नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रा. संतोष सातपुते यांनी सूत्रसंचालन केले, तर धनश्री घोडे यांनी आभार मानले.