मुळेवाडीत भरदिवसा शेतकऱ्याच्या घरात चोरी | अडीच लाखांचा ऐवज लंपास

मुळेवाडीत भरदिवसा शेतकऱ्याच्या घरात चोरी | अडीच लाखांचा ऐवज लंपास

कर्जत : बंद घराचा कडीकोयंडा व कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी (ता. १० सप्टेंबर) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मुळेवाडीत घडली.

याबाबत योगेश रामराव मुळे (वय ३१, रा. मुळेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मुळे हे शेतकरी असून घटनेच्या दिवशी ते आई व पत्नीसह आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा कुलूप लावून बंद केले होता. मात्र, ते सायंकाळी घरी आल्यानंतर घराचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला त्यांना दिसला. घरात प्रवेश केला असता, बेडरूममध्ये कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच दागिने व ३१ हजार रूपये रोख रक्कमही गायब झाली होती.

या प्रकरणी योगेश यांनी पोलिसांना कळविले असता, कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिस निरीक्षक गायकवाड व त्यांच्या पोलिस पथकाने येऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एकीकडे शेतकरी या कोरोना महामारीमध्ये दिवसरात्र शेतात राबून एक एक पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो शेतात गेल्यानंतर अशा प्रकारे घरफोडी होऊन लाखोंचा ऐवज लंपास केला जातो. दिवसाढवळ्या रस्त्यालगत असलेल्या घरामधून अशी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास लावावा, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.