कुंदाताईंनी घेतलेला रक्तदान शिबिर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद – वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे

कुंदाताईंनी घेतलेला रक्तदान शिबिर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद - वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे
  • उन्नतीचे सामाजिक कार्य म्हणजे शांतता, अहिंसेच्या मार्गाने प्रगतीची कास धरणारी चळवळ – कुंदाताई भिसे
  • रक्तदान शिबिराचे पोलीस अधिकारी टोणपे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्ताचा तुटवडा जाणवल्यास मोठा फटका बसतो. त्यामुळे कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सौ. कुंदाताईंनी राबविलेला हा उपक्रम आयुष्याला वरदान देणारा ठरत आहे. कोरोना कमी-अधिक प्रमाणात असला तरी त्यांचे हे कार्य संपलेले नाही. ते आजही तेवढ्याच उत्साहाने व वेगाने सुरू आहे. त्यामुळे सौ. कुंदाताईंचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे मत सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी व्यक्त केले.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय (आबा) भिसे, नवचैतन्य हास्य क्लब, आनंद हास्य क्लब व विठाई वाचनालयचे राजेंद्र नाथ जयस्वाल, डॉ. सुभाषचंद्र पवार, शंकरराव पाटील, विलास नगरकर आदींसह असंख्य सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरात 107 युवकांनी रक्तदान केले. शिबिराचे नियोजन करण्यासाठी ‘रुबी एलकेअर’च्या डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफने सहकार्य केले. डॉ. ए. एम. बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पीआरओ सुनील पाटील, एस. काळेकर, टेक्निशियन सुनिता नलगिरे, भाऊसाहेब कार्णे, नर्स लक्ष्मी हरिहर, रामप्रताप जैस्वाल, संजय भैकर, विशाल, निंगराज बी. आदींनी शिबिराचे कामकाज अत्यंत कुशलतेने हाताळले.

कुंदाताईंनी घेतलेला रक्तदान शिबिर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद - वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे

कुंदाताई भिसे म्हणाल्या, उन्नती सोशल फाऊंडेशन ही केवळ संस्था राहिली नसून ही एक सामाजिक उपक्रमाची चळवळ आहे. आपल्या प्रत्येकाच्या योगदानावर ही चळवळ अधिकाधीक प्रबळ बनत चालली आहे. फाऊंडेशनचा परिवार आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिंपळे सौदागरमधील प्रत्येक नागरिक या परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे आमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला कोणत्या गोष्टीची गरज भासल्यास ती तत्काळ उपलब्ध करून दिली जाते. एवढे कार्य या परिवाराने उभे केले आहे. ही चळवळ शांतता, अहिंसेच्या मार्गाने प्रगतीची कास धरणारी चळवळ आहे. प्रत्येक सदस्याच्या साक्षिने ही ती अशीच पुढे जात राहणार आहे. पिंपळे सौदागरमधील कोणत्याही नागरिकाला अडीअडचणीच्या काळात उन्नतीची साथ कायम राहणार आहे. रक्तदान शिबिरच नव्हे तर कोणतेही सामाजिक कार्य असो, तिथे उन्नती सक्षमपणे कार्यरत आहे, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत कुंदाताईंनी समाधान व्यक्त केले.

कोविड काळातील उन्नतीचे कार्य कौतुकास्पद

कोविड काळात उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत उभी करून देण्यात आली. पिंपळे सौदागरमधील हजारो नागरिकांना आर्सेनिक अलबमच्या टॅबलेट्स वाटप केल्या. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशातील मार्केट बंद होते. अशा परिस्थितीत उन्नतीच्या सदस्यांनी पिंपळे सौदागरमधील नागरिकांना भोजन किट्स वाटप केल्या. पॉझीटिव्ह रुग्णांना बेड्स उपलब्ध करून दिले. दुर्मिळ बनलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन्स अधिका-यांशी समन्वय साधून उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेकांचे प्रमाण वाचले. अनेकांना जीवदान मिळाले. एवढेच नव्हे तर रुग्णांना प्लेटलेट्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, रक्ताचा तुटवडा भासू दिला नाही. अशा अनेक प्रकारची मदत उन्नतीच्या माध्यमातून पिंपळे सौदागरमधील नागरिकांना गेल्या पाच वर्षात करण्यात आली. त्यामुळे सामाजिक कार्याच्या बाबतीत उन्नतीचा आदर्श पिंपरी-चिंचवडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अधोरेखीत करण्याजोगा आहे.