काळेवाडी-थेरगाव-वाकड दफनभूमी मागणीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

काळेवाडी-थेरगाव-वाकड दफनभूमी मागणीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
  • नगर विकास विभागाला दिले कार्यवाहीचे आदेश; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी दिले होते निवेदन

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : काळेवाडी, थेरगाव व वाकड परिसरात मुस्लिम समाज दफनभूमीची मागणी सातत्याने होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरात मुस्लिम समाज दफनभूमी नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला चिंचवड किंवा नेहरूनगर येथे दफन विधीसाठी जावे लागते. मात्र, कोरोना महामारी काळात दफनविधीसाठी या समाजाची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे समाजात प्रशासनविरोधात नाराजीचा सूर आहे. या तीन गावांसाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मुस्लीम समाजाच्या वतीने सातत्याने मागणी होत आहे. त्याच अनुषंगाने इरफान शेख यांनी महापालिका तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

दरम्यान, शहरातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षात घेता, पिंपरी चिंचवड महापालिका विकास आराखड्यात दफनभूमीसाठी शहरातील विविध भागात जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र, सुमारे २० वर्षे उलटूनही महापालिकेच्या वतीने या जागा ताब्यात घेऊन बहुसंख्य आरक्षणे विकसित करण्यात आलेली नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. अशा प्रतिक्रिया समाजातून उमठत आहेत. मात्र, याचाही पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.