मुंबई : सीएसआरतंर्गत समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या कॉपोरेट कंपन्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित द सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार – 2021 सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या व्यतिरिक्त माजी वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे, समाजसेवक . डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे आणि द सीएसआर जर्नलचे संपादक अमित उपाध्याय, मुंबई पोलिस कमिश्नर संजय पांडे, राज्याच्या संसर्गजन्य प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आपल्या देशात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर राखणे ही सुद्धा आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या मातृभाषेचा सन्मान करणं खुप गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक कामासह सिटिजन सोशल रिस्पाँन्सिबिलिटी सुद्धा खूप आवश्यक आहे. ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. समाजाचं आपण काही देणं लागतो या अनुषंगाने काही लोक पैशासाठी नव्हेतर समाजातील लोकांना फायदा व्हावा यासाठी निस्वार्थपणे अहोरात्र काम करत आहेत. या लोकांना मानव नव्हे तर देवता समान मानले पाहिजे. सामाजिक क्षेत्रात कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करण्याचे काम करत आहेत. अशा लोकांचा पुरस्कार देऊन त्यांना त्यांच्या कामासाठी सतत प्रोत्साहन दिले पाहिजे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “गेल्या १५ वर्षांपासून मी समाजासाठी काम करत आहे, त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होऊन मला खूप आनंद होत आहे. कंपन्याद्वारे जो निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातून समाजाला खूप मोठ्याप्रमाणात मदत होत आहे. लोकाप्रती सेवाभाव असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी काम करतील. राजकारणातील लोकांनी सुद्धा राजकारणासह थोड्याफार प्रमाणात समाजकार्य केले पाहिजे. काही कंपन्या हे काम करत आहेत. परंतु सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी काम केल्यास याचा नक्कीच फायदा समाजाला होईल. सामाजिक कामासाठी निधी उपलब्ध करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणं आवश्यक आहे. यामुळे समाजाचा चेहरा नक्कीच बदलालया मदत होईल. याशिवाय समाजकार्य करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजासाठी काही वेगळ्या कल्पना राबवता येतील का याचाही विचार करणे आवश्यक आहे.”
माजी वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “समाजसेवेसाठी पैसे खर्च करणार्या सर्व काँपोरेट कंपन्यांचे मी धन्यवाद करतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की कंपन्यांनी त्यांच्या उत्पन्नातील ऐवढा पैसा समाजासाठी खर्च केला आहे. त्यापेक्षा अधिक उत्पन्न ते कमवतील त्यांच्या कंपनीची खूप भरभराट व्हावी. जेणेकरून ते अधिकाधिक सामाजिक सेवेसाठी योगदान देऊ शकतील. सीएसआरदवारा देण्यात येणार्या निधीतून सामाजिक काम मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे समाजाचा फायदा होत आहे. त्यामुळे सीएसटीआरसंदर्भात तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोहोचणं गरजेचे आहे. “
भारतीय कॉर्पोरेट जगतात (इंडिया इन्क) उत्कृष्ट प्रशासनाबाबत सर्वसमावेशक व्यापक अशी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. समाजातील त्यांची जबाबदारी लक्षात घेऊन सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा द सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार हा सात विभागांसाठी दिला जातो. यात कृषी आणि ग्रामीण विकास, कोविड-१९ मदत, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता, क्रीडा आणि महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभागाचा समावेश आहे.
या विभागात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंपन्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कृषी आणि ग्रामीण विकास विभागासाठी भारत रन फोर्स या कंपनीला व्दितीय तर भारत अॅल्युमिनियम कंपनीला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. तर आदित्य बिर्ला कँपिटल या कंपनीला सीएसटीआर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल जिंदाल स्टील अँण्ड पावर लिमिटेड या कंपनीला सर्वाकृष्ट पुरस्कार देण्यात आला आहे. सोशल वेलफेअर अँड मॅनेजमेंट या विभागासाठी जिग्नेश इराणी यांना पुरस्कार देण्यात आला आहे. मॅरिको लिमिटेड शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणसाठी पर्यावरण – डाबर, आरोग्य आणि स्वच्छता – सनोफी इंडिया लिमिटेड खेळात हिंदुस्थान झिंक आणि महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण विभागासाठी महिंद्र अँड महिंद्रा कंपनीला पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे, दिलीप वेंगसरकर आणि श्रीमती ज्योति म्हापसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय राज मारीवाला, मालविका अय्यर, तन्मय भट्ट यांना यूथ आइकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गाव तिथे देवराई ही चळवळ यशस्वीरित्या राबवत असल्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सयाजी शिंदे यांना विशिष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सीएसआरमध्ये सात विशेष कौतुक पुरस्कारही देण्यात आले
अदानी फाउंडेशन
डीसीबी बँक
महिंद्रा ग्रामीण गृहनिर्माण वित्त
मुथूट फायनान्स लिमिटेड
रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड
विस्तारा – टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड
स्वदेश फाउंडेशन