जॅकवेलच्या कामातील भ्रष्टाचाराची राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘पोलखोल’; सह शहर अभियंत्याला घेराव

जॅकवेलच्या कामातील भ्रष्टाचाराची राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘पोलखोल’; सह शहर अभियंत्याला घेराव
  • प्रशासनाच्या संगनमाने भाजप नेत्यांचा 30 कोटींचा भ्रष्टाचार ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा आरोप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्‍या जॅकवेलच्या कामात तब्बल 30 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून ही निविदा त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुराव्यासह या कामातील भ्रष्टाचाराचे अक्षरश: पोस्टमार्टम केले. तसेच पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना पदाधिकार्‍यांनी घेराव घातला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून महापालिका दणाणून सोडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत झालेल्या या आंदोलनात महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रशांत शितोळे, शाम लांडे, विनोद नढे, सतीश दरेकर, प्रवक्ते विनायक रणसुभे, फजल शेख, माजी नगरसेविका माया बारणे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, कविता खराडे, सुलक्षणा शिलवंत, अकबर मुल्ला, मीरा कदम, संगीता कोकणे, विजया काटे, दत्तात्रय जगताप, काशिनाथ जगताप यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्‍या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा 121 कोटी रुपयांची असताना, 151 कोटी रुपयांची निविदा सादर करणार्‍या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून महापालिका प्रशासनाशी संगनमत करून महापालिकेची लूट सुरू आहे. आयुक्तांनी ही निविदा त्वरीत रद्द करावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तत्पूर्वी पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना आंदोलकांनी घेराव घालत निविदा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी निविदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत प्रश्नांची सरबत्ती केल्याने सवणे यांना पळता भुई थोडी झाली होती. त्यानंतर आंदोलकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. तसेच आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन देऊन जॅकवेलच्या कामाची निविदा रद्द करा, अशी मागणी केली.

हटके घोषणांनी पालिका दणाणली

चाटून खा, फुसून खा, भाजपने सोडला सदाचार, पाण्यातही केला भ्रष्टाचार, जनता के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान मे, प्रशासन हटवा- पिंपरी-चिंचवड वाचवा अशा विविध घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी महापालिका भवन दणाणून सोडले होते. राष्ट्रवादीच्या घोषणा, पुराव्यांसह पोलखोल आणि अधिकार्‍यांची उडालेली भंबेरी यामुळे या निविदेमध्ये मोठा गोलमाल असल्याचेच समोर आले आहे.