१५० गरजू कुटुंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचचे वाटप

१५० गरजू कुटुंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचचे वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : शहरातील वंचित, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या १५० कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप “अन्नपूर्णा आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे घरपोच करण्यात आले. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, डायमंड सोशल अँक्टिव्हिटी ग्रुप, मुनोत भाईपा पिंपरी चिंचवड ग्रुप व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त विद्यमाने शहरात महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

गव्हाचे पीठ, तांदूळ,तूरडाळ,मुगडाळ,हरबरा डाळ,साखर,गुळ, हिरवे मूग,मिरची पावडर,हळद,चहा पावडर, खाण्याचे तेल, मसाला, डिटर्जंट पावडर, साबण आदी वस्तूंचा या जीवनावश्यक संचमध्ये समावेश आहे.

मार्च २०२० च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण आढळुन आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना या घातक विषाणूच्या संसर्गामूळे आपत्कालीन कर्फुही घोषित करण्यात आला. संपूर्ण देशांत लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या तसेच निराधार कुटुंबियांवर उपासमारीचे संकट उभे राहिले. ह्याची दखल शहरातील या प्रमुख स्वयंसेवी संस्थानी घेतली त्यानुसार गरजवंत कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य संचाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमास प्रमुख सहभाग चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित खुळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. जी. कांबळे, डायमंड सोशल अँक्टिव्हिटी ग्रुपचे संतोष छाजेड, विजय मुनोत, राजेंद्र कटारिया, अशोक नहार, विजय नहार तसेच मुनोत भाईपा पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचे राजेंद्र मुनोत व अनुप मुनोत, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. जयवंत श्रीखंडे यांनी घेतला.

घरोघरी वस्तू संच वाटप उपक्रमासंदर्भात पोलीस निरीक्षक सत्यजित खुळे म्हणाले,”कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन परस्थितीमध्ये रोजंदारी करणाऱ्या कुटुंबियांची सध्या ससेहेलपाट होत आहे, बिजलीनगर वाल्हेकरवाडी परिसरात अश्या कुटुंबियांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य मोफत पुरविणे नक्कीच कौतुकस्पद आहे.”

डायमंड सोशल अँक्टिव्हिटी ग्रुपचे विजय मुनोत म्हणाले,” पिंपरी चिंचवड शहर या कामगार नगरीवर गेल्या ३५ वर्षांमध्ये प्रथमच एवढी भीषण उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अश्या आपत्कालीन परस्थितीत त्यांना महिनाभर पुरेल असे संपूर्ण रेशन संच देण्याचे नियोजन आम्हा सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. परिसरातील कामगारांच्या भुकेला त्यामुळे आता पूर्णविराम मिळणार आहे.”

डॉ.जयवंत श्रीखंडे म्हणाले,” कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा गर्दीच्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता सामान्य नागरिकांनी घेणे सद्यस्थितीत जास्त आवश्यक आहे. आजचे अन्नधान्य संच वाटप नियोजनामुळे अनेक गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.”

समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” आज रोजी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला कामगार नगरीमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त मोहिमेमुळे अन्नपूर्णा आपल्या दारी नियोजन यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबियांना या आर्थिक हालाखीच्या काळात मध्ये मोठा सहारा मिळणार आहे.लॉकडाऊन अजून वाढले तर मोठया अडचणींना ह्या गरीब कुटुंबांना सामोरे जावे लागणार आहे.त्यासाठी समितीच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.”

उपक्रमास सहकार्य उदय गार्डन सोसायटीचे अभिजीत देशपांडे, रवी हेळवर, हरीश जारवाल, निलेश डावरे, संजू कांबळे, गोपी जारवाल, गणेश हेळवर, भिरु हिंगाळे, आकाश लोणी यांनी केले.