मुंबईत दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

  • आक्षेपार्ह प्रसंग न वगळल्यास दबंग ३ वर बहिष्कार टाकण्याचा इशारा

मुंबईत दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

मुंबई (लोकमराठी) : २० डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या दबंग ३ या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून व हातात गिटार घेऊन हिडिस अन् आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. आमच्या श्रद्धास्थानांचे विडंबन आम्ही कदापी सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशा इशारा समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी दादर येथील आंदोलनाच्या वेळी दिला.

दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात रविवारी (ता. 8 डिसेंबर) रोजी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांनी हा निर्णय घेतला. या आंदोलनात हिंदू राष्ट्र सेना, बजरंगदल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, वज्रदल, हिंदु जनजागृती समिती, शिवपुत्र प्रतिष्ठान, श्रीराम-गणेश मित्रमंडळ (धारावी), सनातन संस्था, रणरागिणी शाखा आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनात धार्मिक तेढ निर्माण करणारा दबंग 3 बंद करा, हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या सलमान खान याचा धिक्कार असो, अशा उत्स्फूर्त घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. हातामध्ये फलक धरून धर्माभिमानी या आंदोलनात सहभागी झाले होते. सेन्सॉर बोर्डाने दबंग ३ चित्रपटातून भारतीय संस्कृतीचे केले गेलेल्या विडंबनाचे प्रसंग तात्काळ काढून टाकावेत, तोवर चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी हिंदूत्ववादी संघटनांनी केली.

धार्मिक भावना जपल्या जाव्यात म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या प्रसिद्धीसाठी आंदोलन चालू आहे, असे म्हणणार्‍या सलमान खान यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आम्ही संपूर्ण चित्रपटाला विरोध केलेला नाही. तर धार्मिक भावना दुखवणारा आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली आहे; मात्र, आमच्या भावनांची अशी अवहेलना जर सलमान खान करणार असतील, तर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहोत. असे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक यांनी सांगितले.