कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन|पोलिसांवरील विश्वास दृढ करणारा निर्णय – सिद्दीक शेख

कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन|पोलिसांवरील विश्वास दृढ करणारा निर्णय - सिद्दीक शेख
  • पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव

पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले, एवढयावरच न थांबता अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची निर्मिती करून शहरातील अनेक अवैध धंद्यांवर धाडी टाकून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणून त्या क्षेत्रातील गुन्हेगारांची मक्तेदार मोडीत काढली. यामुळे पोलीस दलातीलच काही पोलीस अधिकारी त्याना शिव्या, शाप देऊ लागले, परंतु त्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली. तसेच पोलीस आयुक्तालयात गेलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्येकाची तक्रार ऐकून घेऊन त्यावर कायदेशीर अंमलबजावणी व कृतीच्या माध्यमातून तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांविषयी असलेली भीती कमी करून विश्वास दृढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे मत अपना वतन संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी व्यक्त केले आहे.

शेख यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणवर मटका, जुगार, अवैध दारू विक्री, वेश्याव्यवसाय असे अवैध धंदे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने सर्रासपणे सुरु होते. यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची पार्टनरशिप होती. पोलिसांच्या आशीर्वादाने असे अनेक अवैध धंदे शहरातील अनेक गुन्हेगार चालवत होते. पोलिसच पार्टनर असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा वाचक कमी झाला होता. त्यातूनच गुन्हेगारांना झुकते माप देणे, त्यांना अनेक गुन्ह्यातून वगळणे, गुन्ह्यातील कलम कमी करून त्यांचा बचाव करणे व या माध्यमातून अमाप पैसे कमावणे असा गोरखधंदा सुरु होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांविषयी आदर कमी भीतिच जास्त वाटत होती. प्रामाणिक कार्यकर्ते, नागरिक, महिला या सर्व घटकांना असुरक्षित वाटत होते. परंतु आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सूत्रे हाती घेतल्यानंतर हळू हळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे.

तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या, आर्थिक तडजोड करून गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस दलातीलच अधिकाऱ्यांचे निलंबन करून कायद्यापुढे सर्व सामान आहेत. येथे चुकीच्या गोष्टींची खैर केली जाणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. चिंचवड पोलीस स्टेशन व पिंपरी पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचे विविध सामाजिक संघटना,पत्रकार, ज्येष्ठ नागरिक ,महिला संघटना सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कामामुळे सर्वसामान्य जनता, प्रामाणिक कार्यकर्ते सुखावले असताना ,काही जण दुखावले जाणार हे साहजिकच आहे. त्यामुळे ते आपल्याविरोधात कारस्थाने रचनार हे सर्वश्रुत आहे .परंतु आपण कायद्यापुढे जात – धर्म, नेता -पुढारी ,गरीब – श्रीमंत असा भेदाभेद न करता ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या युक्तीप्रमाणे आपण देशाची व समाजची सेवा करावी. आमच्या सारखे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते सदैव आपल्या पाठीशी राहू तसेच ज्यांना ज्यांना आपल्या माध्यमातून न्याय मिळाला आहे, तसेच आपल्या निर्णयामुळे जे सुखी झाले आहेत अशा अनेक गोर, गरीब, कष्टकरी जनतेचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतील.