पिंपळे सौदागर येथील ”तिरंगा सन्मान यात्रेला” भरभरून प्रतिसाद; नागरिकांकडून पुष्पवृष्टी अनं स्वागत

पिंपळे सौदागर येथील ''तिरंगा सन्मान यात्रेला'' भरभरून प्रतिसाद; नागरिकांकडून पुष्पवृष्टी अनं स्वागत
  • ”भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है” अशा घोषणांनी परिसर दणाणला
  • राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील – कुंदाताई संजय भिसे

पिंपरी, ता. १६ : देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन पिंपळे सौदागर परिसरात घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्यात आला. प्रत्येक भारतीय नागरीकाला आपली देशभक्ती व्यक्त करण्यासाठी भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या वतीने १५ ऑगस्ट दिनी ” तिरंगा सन्मान यात्रे”चे आयोजन करण्यात आले होते.

देशभक्तीपर गीतांसह ठीक सकाळी १० वाजता पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातून या यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेत जवळपास पाचशे नागरिक सहभागी झाले होते. ढोल-लेझीमच्या गजरात ठिकठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा आणि यात्रेचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ७५ फुटी झेंड्याकडे पाहत नागरिकांचा राष्ट्रप्रेमाने ऊर भरून येत होता. शेकडो लोक हातात तिरंगा घेऊन ” भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है ” अशा घोषणा देत होते.

स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण मैदानावर राष्ट्रगीताने यात्रेचा समारोप झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिक शांताराम सोंड, उद्योजक विजयकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, वरिष्ठ पोलीस अधिकारी देशपांडे, माजी हवाई दल अधिकारी अशोक चव्हाण, निवृत्त पोलीस विनायक शिंदे, जेष्ठ नागरिक डी. बी. कडते, निवृत्त जवान राजेंद्र जयस्वाल, निवृत्त लष्करी अधिकारी चिंतामणी कविटकर या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पिंपळे सौदागर येथील ''तिरंगा सन्मान यात्रेला'' भरभरून प्रतिसाद; नागरिकांकडून पुष्पवृष्टी अनं स्वागत

तिरंगा सन्मान यात्रेत भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ भिसे, भाजपा चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, अशोक काटे, रमेश जगताप, भानुसाद काटे पाटील, राजू भिसे, आनंद हास्य क्लबमधील सर्व सभासद, विठाई वाचनालय, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कुंदाताई भिसे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, भारतासारख्या प्राचीन राष्ट्राच्या प्रवासातल्या एका ऐतिहासिक टप्प्याच्या दिशेने आपण आज वाटचाल करतो आहोत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्व पिढ्यांनी कठोर परिश्रम केले. मोठमोठ्या आव्हानांचा सामना केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात देशाने उत्तुंग प्रगतीची झेप घेतली आहे. त्यामुळेच आज जगभरात आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. ” तिरंगा सन्मान यात्रे ” च्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरात ज्वलंत राष्ट्रभक्तीची ज्योत पहावयास मिळाली. स्वातंत्र्यदिनासारखीच ही प्रखर राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत राहील, यासाठी कायम प्रयत्नशील राहील.