अपर्णा कुलकर्णी
सध्याच्या आजाराच्या घटनेने आपल्याला कळले आहे की, एकता, आपल्याला परिस्थितीशी लढाई करण्यास मदत करते. या रोगाचा सर्वत्र परिणाम झाला आहे. लिंग, वय, धर्म, राष्ट्रीयत्व आणि वंशिकता याची पर्वा न करता सर्वत्र याचे पडसाद उमटले आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक देखील आहेत. यामुळे घरून कार्य करणारी एक नवीन अर्थ व्यवस्था सुरू झाली आहे. आरोग्य आणि स्वच्छता ही नागरीक तसेच राष्ट्राची प्राथमिकता बनली आहे.
या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना आपण करत आहोत. त्याचबरोबर यातून नवनवीन संधी देखील निर्माण होताना दिसत आहेत. करोनाची (Corona) लाट आल्यावर जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली, तशी आपल्याला विविध गोष्टींची कमतरता भासू लागली. अनेक वैद्यकीय आव्हानांचा आपण सामना केला किंबहुना अजूनही करत आहोत. यामध्ये सगळ्यात जास्त कमतरता जाणवली ती रूग्णखाटांची. प्रामुख्याने दुसरी लाट आल्यावर दिवसागणिक याची कमी भासत होती. मोठमोठ्या शहरांमध्ये साधारणपणे 20,000 तर छोट्या शहरांमध्ये 2000 इतक्या रूग्णखाटांची रोज कमतरता होती. याचबरोबर ऑक्सिजन्सची अनिश्चितता असल्याने रूग्णांची परवड झाली. अनेक लोकांना या अनिश्चिततेमुळे त्यांचे प्राण गमवावे लागले. यामधे 35 ते 50 वयोगटातील अनेक पुरूषांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे बरीच कुटुंब उध्वस्त झाली. यामुळे एक भयाची लाट निर्माण झाली.
या महामारीने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. रोजचा व्यवहार ठप्प झाला. कित्येक औद्योगिक वसाहती बंद पडल्या. अनेक कामगारांना कामावरून काढावे लागले. हाॅटेल इंडस्ट्रीलाही याचा फटका बसला. ब-याच जणांचे हाॅटेल्स बंद पडल्याने त्यांना पैसे मिळवण्यासाठी वेगळ्या वाटा निवडाव्या लागल्या. ट्रॅव्हल व टुरीझम क्षेत्रावरही याचे पडसाद दिसत आहेत.
शैक्षणिक (Education) क्षेत्रात अनेक मोठे व अनपेक्षित बदल होत आहेत. संपूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेताना विद्यार्थ्यांनाही रोज विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक छोट्या गावात आणि शहरात इंटरनेटची सुविधा नसल्याने मुलांचे नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील प्रत्यक्ष संवाद बंद झाला आहे. परिक्षा पद्धतीत देखील मोठे बदल होताना दिसत आहेत.
मनोरंजन क्षेत्रावरही याचा गंभीर परिणाम झाला. हातावर पोट असलेल्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. नाटकात पडद्यामागे काम करणा-या अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. शुटींग, नाटकाचे प्रयोग, दौरे या गोष्टींना परवानगी नसल्याने रोजंदारीवर काम करणा-यांची आर्थिक परवड झाली.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. आव्हानांसोबतच यातून विविध नवीन संधी ही निर्माण होत आहेत. या काळात नकारात्मक गोष्टींबरोबरच अनेक सकारात्मक गोष्टी व बदल देखील निदर्शनास येत आहेत.
सर्व प्रकारची कामे, सुविधा बंद पडल्याने कृषी क्षेत्रात किती काम आहे याची जाणीव अनेकांना झाली. आयात- निर्यात करता येत नसल्याने देशांतर्गत बाजारपेठांचा अभ्यास करण्यास सुरूवात झाली. सर्व प्रकारच्या व्यवसायांना नवीन दिशा मिळाली. त्याचबरोबर फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीतही नवीन संधी निर्माण झाल्या. घरपोच सेवांना गती आली. त्यामुळे अनेक रोजंदारीवरील लोकांना काम मिळण्यास मदत झाली. ऑनलाईन पद्धतीमुळे टेलिकॉम, कम्युनिकेशनला खूप महत्व आलं.
या कठीण परिस्थितीमुळे कौटुंबिक ताण निर्माण झाला. त्यामुळे मानसशास्त्र व मनोचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. मानसिकरित्या सकारात्मक व स्थीर राहण्यासाठी याची प्रचंड गरज भासत आहे.
करोनामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात विविध प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. जवळपास सर्वच सुविधा घरपोच मिळत असल्याने कमी गर्दी मध्ये यश मिळवणे चातुर्याचे ठरेल. लहान सहान गोष्टींमधील मोठमोठे बदल पाहाता प्रत्येकाला काळानुरूप तसेच एकत्रितपणे काम करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव आपल्याला या परिस्थितीमुळे झाली आहे. सकारात्मकता आणि नवनवीन कल्पना यांची सांगड घालून या परिस्थितीकडे एक नवीन संधी म्हणून पाहण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त झाली. लाॅकडाऊन प्रत्येकासाठी आरसा म्हणून काम करत आहे.
नकारात्मक, वाईट गोष्टींबरोबरच मोठ्या प्रमाणात चांगले आणि सकारात्मक बदल होताना आपण रोज पाहात आहोत. विविध क्षेत्रात असंख्य संधी निर्माण होत आहेत. याच संधींचं सोनं करत आपण सगळं काही सुरळीत करू शकतो. आपल्याकडे पुन्हा जग सुरू करण्याची शक्ती आहे. या महामारीला नवीन सुरुवात म्हणून पाहूया आणि योग्य दिशेने जाऊया.