- बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जाती स्वयं सहाय्यता युवा गटाला दिले जाणार महिनाभर प्रशिक्षण
लोकमराठी न्यूज नेटवर्क
शिवाजीनगर : बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील युवक-युवतींकरिता एक महिना कालावधीचा मोफत (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारपासून (ता. ६ जून) सुरूवात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) शिवाजीनगर, पुणे येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बार्टीचे उपायुक्त उमेश सोनवणे, समतादूत विभाग प्रमुख नितीन सहारे, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, प्रकल्प अधिकारी मनुकुमार शेळके, एमसीईडीचे प्रकल्प समन्वयक सुनिल पाटील, समतादूत किर्ती आखाडे, उषा कांबळे, प्रशांत कुलकर्णी, भारती अवघडे, अनिता दहीकांबळे, सचिन कांबळे, शशिकांत जाधव व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. त्याप्रसंगी समाजातील तळागाळात जाऊन कार्य करत असलेल्या समतादूतांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी नितीन सहारे म्हणाले की, तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात कठिण परिश्रम केल्यास तुम्ही नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे होऊ शकता. युपीएससी परिक्षेत सुमारे १२ लाख परिक्षार्थी प्रयत्न करतात. मात्र, त्यामधील ८०० जणच यशस्वी होतात. त्यामध्ये निवड झालेल्यांना चांगली नोकरी मिळते, विदेशातही नोकरीची संधी मिळते. बाकी परिक्षा देणाऱ्यांचे काय होते. याचा विचार करणे गरजेचे असून जास्तीत जास्त तरूणांनी व्यवसाय उतरणे गरजेचे आहे.
उमेश सोनवणे म्हणाले की, उद्योजक घडवणे ही शासनाची संकल्पना असून त्यामागील उद्देश आहे की, जास्तीत जास्त युवकांना व्यवसायात आणणे. बार्टी मार्फत जे स्वयं सहाय्यता गट तयार केले जातात, त्यामुळे एकीचे बळ निर्माण होते. त्यामध्ये आपल्याला व आपल्या समाजाला शासनाच्या मदतीने प्रगती पथावर आणायचे आहे. सध्या बऱ्याच व्यवसायात विशिष्ठ जातीच असतात. अनुसूचित जातीचे लोक जास्त नाहीत, त्याची कारणे अनेक आहेत. मात्र, शासनाच्या या उपक्रमातून अनुसूचित जातीचे जास्तीत जास्त तरूण उद्योगात येतील. असा विश्वास आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदनकुमार शेळके यांनी केले. प्रास्ताविक शितल बंडगर यांनी केले तर सुदाम थोटे यांनी आभार प्रदर्शन केले.