नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान

नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान

पिंपरी : थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तमन्ना शेख हिने उत्कृष्ट यश मिळवले. त्यामुळे तीची नायब तहसीलदार पदी निवड झाली.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तमन्ना हिला सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणारे शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयॊगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली.

”मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता कमी आहे, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवतात. त्यामुळे मुस्लिम महिला संवेदनशील असतात. ह्या जातीच्या बुरख्यातून बाहेर पडून पुढील पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व नवीन पिढीला आगळा वेगळा आदर्श निर्माण करावा.” असे उद्गार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी काढले.

”मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम समाजात अनेक होतकरू मुले-मुली कष्ट करणारे, जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करणारे आहेत. आज समाजाला मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याकरिता समाजाने व कुटुंबातील अश्या होतकरू मुले, मुलींना, प्रामुख्याने मुलींना मार्गदर्शन, व त्यांनांचे मनोबल वाढविण्याचे काम करणे गरजेचे आहे. असे झाल्यास समाजकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल व नवीन क्रांती येईल. असे आम्हास वाटते. यात समाजाने मुलींना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. लक्ष गाठण्यासाठी त्यांना चार भिंतीत न ठेऊन त्यांना पंख देण्याची गरज आहे. असे मत काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम व्यक्त केले.