प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा

प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा
  • ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : वर्ष १६५९, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, याच दिवशी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला राक्षसीवृत्तीच्या अफझलखानाला छत्रपती शिवरायांनी संपवला. हा दिवस ‘शिवप्रतापदिन’ साजरा केला जातो. जगातील सर्वांत महान १० युद्धाच्या घटनांपैकी एक मानली जाणारी ही घटना, विदेशांतील लष्कराला शिकवण्यात येते; मात्र दुर्दैवाने जेथे हा महापराक्रम झाला, तेथे या घटनेविषयी साधी माहिती देणारे एकही स्मारक नाही. यासाठी आज ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत! पाच मोगली पातशाह्या हिंदुस्थानावर राज्य करत असतांना राजमाता जिजाऊंनी पाहिलेले ‘हिंदवी स्वराज्या’चे स्वप्न पूर्ण करणारा परमप्रतापी हिंदु राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! ‘काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी ना होते, तो सुन्नत होती सबकी।’ असे कवी भूषण यांच्या काव्यातून त्यांना छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वानेच आज हिंदु समाज टिकून आहे, हेच सांगायचे आहे.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा जर प्रत्येक बालमनावर कोरली गेली, तर यापुढेही हिंदु समाजातून शूरवीर पराक्रमी अशी पिढी निश्‍चितच निपजेल. यासाठी छत्रपती शिवरायांनी केलेल्या ऐतिहासिक पराक्रमाच्या स्थानांवर त्यांची स्मारके व्हायला हवीत. असेच एक महापराक्रमाचे स्थान म्हणजे अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, तो प्रतापगडाचा पायथा! याठिकाणी भव्य असे ‘शिवप्रताप स्मारक’ उभारून त्यामध्ये अफझलखानवधाची भव्य प्रतिकृती साकारण्यात यावी.

या ऐतिहासिक घटनेचा अर्थात युद्धनीतीचा संपूर्ण बारकाव्यांनिशी उपलब्ध असलेला सचित्र, सप्रमाण तपशील या ‘शिवप्रताप स्मारका’मध्ये देण्यात यावा, तसेच या महापराक्रमाची ध्वनीचित्रफित बनवून ती दाखवण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे उद्धव ठाकरे निश्‍चितच हे स्मारक उभारतील, अशी आशा घनवट यांनी या वेळी व्यक्त केली.