साधू व देवतांचा अवमान करणारा दबंग ३ चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी

साधू व देवतांचा अवमान करणारा दबंग ३ चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी 
मुंबई (लोकमराठी) : साधू आणि देवता यांचा अवमान करणार्‍या दबंग ३ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी मंगळवारी (९ डिसेंबर) विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना निवेदन दिले. या वेळी शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे अध्यक्ष प्रभाकर भोसले, हिंदू राष्ट्र सेनेचे प्रकाश सावंत, वज्रदल संघटनेचे विमल जैन, हिंदु जनजागृती समितीचे परेश कोळी, अ‍ॅड. रणधीर सकपाळ आणि सुधीर सकपाळ उपस्थित होते.

सलमान खानचा २० डिसेंबरला दबंग ३ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यातील हूड-हूड दबंग-दबंग या गाण्यामध्ये साधूंना गिटार घेऊन नाचतांना दाखवण्यात आले आहे. साधूंना हिडिसपणे नाचतांना दाखवणार्‍या सलमान खानला याच गाण्यात देवता आशीर्वाद देतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. दबंग ३ ला प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, याविषयी सेन्सॉर बोर्डाला यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. असे हिंदु जनजागृती समितीचा प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी सांगितले.