सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे संपादक डॉ. रवींद्र रसाळ यांचे निधन

सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे संपादक डॉ. रवींद्र रसाळ यांचे निधन

परभणी (लोकमराठी) : दैनिक ‘गोदातीर समाचार’चे माजी संपादक डॉ. रवींद्र रसाळ (वय ७५) यांचे (दि. ८ डिसेंबर) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराने परभणी येथे निधन झाले आहे.

गोदातीर समाचारच्या स्थापनेनंतरच्या काळापासून गोदातीर समाचारचा विस्तार करणे, सायकलवरून फिरून बातम्या गोळा करणे, खेडोपाडी वार्ताहर तयार करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणे, वार्ताहरांच्या बातम्यांवर संपादकीय संस्कार करणे, बातम्यांचे प्रूफ्स तपासणे, वर्तमानपत्रांचे गठ्ठे बांधणे, एसटीला गावोगावचे पार्सल टाकणे अशी कामेही त्यांनी केली. तसेच ते एक तत्त्वचिंतक संपादक होते.

कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊनच ते लिहीत. विज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. भूकंपावरही त्यांचे संशोधन होते. कश्मीर प्रश्नावर त्यांनी कितीतरी संपादकीय लेख लिहिले व उपायही सुचविले होते. मराठवाड्यातील साहित्यिक पिढी घडविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची स्वतःची सात-आठ पुस्तके प्रकाशित आहेत.

या डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात त्यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाचा सोहळाही आयोजित करण्याची परभणी येथे तयारी चालू होती परंतु तत्पूर्वीच या जगातून ते कायमचे निघून गेले.