मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; अपना वतन संघटनेची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; अपना वतन संघटनेची मागणी

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक-अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम १५३, १५३ अ, १५३ ब, २९५ अ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या हिजाब प्रकरण, काश्मीर फाईल्स सारख्या प्रकरणामुळे देशातील व महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करीत आहेत. अशा प्रसंगी देशात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांचे असताना मुस्लिम बांधवांच्या रमजान सारख्या पवित्र महिना सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग केली आहे.

शनिवार दि. २/०४/२०२२ रोजी राज ठाकरे यांनी असे वक्तव्य केले कि, ” मदरशांवर धाडी टाका, त्यामध्ये काही काही सापडेल. तसेच मशिदींवरील लागलेले भोंगे उतरावेच लागतील, सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर आजच सांगतोय, आत्ताच सांगतोय ज्या मशिदीच्या समोर भोंगे वाजतील त्यासमोर जाऊन दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. “राज ठाकरे यांनी केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेस बाधक व समाजात द्वेष पसरवणाऱ्या या वक्तव्यांमुळे दुसऱ्याच दिवशी दि. ३/०४/२०२२ रोजी कल्याण मधील साई चौकात मनसे कार्यकर्त्यांनी अजान विरोधात हनुमान चालीसा लावून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार दि. २/०४/२०२२ रोजी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सरपणे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट, बेताल विशिष्ठ धर्मियांच्या भावना दुखवण्याचा उद्देशाने व दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवून दहशत माजवण्याच्या हेतूने हेतूतपुरस्सर आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे .यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३ अ, १५३ ब, २९५ अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०४, १२० ब, ३४ प्रमाणे गुन्हा तात्काळ दाखल करावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सादर मागणीचे निवेदन वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना देण्यात आले. त्यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, तौफिक पठाण, संतोष शिंदे, प्रकाश पठारे, वासिम पठाण, प्रकाश घोडके, अल्ताफ शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ईमेलद्वारे निवेदन पाठविण्याचे आवाहन

सदर निवेदन सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या लेटरहेडवर स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावे तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना खालील ईमेलद्वारे पाठवावे. असे आवाहन सिद्दीकभाई शेख यांनी केले आहे. CM@maharashtra.gov.in | dilipwalsepatil3@gmail.com | dgpms.mumbai@mahapolice.gov.in