पिंपरी : कुरिअरने मागविलेल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान, असा तीन लाख २२ हजारांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. दिघी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये अवैधपणे तलवारीचा साठा आढळून आला होता. त्या अनुषंगाने सर्व कुरिअर कंपनीमध्ये येणाऱ्या सर्व पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनींग करणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुरिअर कंपन्या त्यांच्या गोडाउनमधील माल एक्सरे मशीनमधून स्कॅन करीत होत्या.
डीटीडीसी कुरिअर कंपनीचे दिघी येथे मध्यवर्ती वितरण केंद्र असून, कंपनीचे दिघी येथे गोडाऊन आहे. आरोपी उमेश सुद याने आरोपी अनिल होन याला २ लाकडी बॉक्स डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये पार्सल पाठविले होते. हे बॉक्स १ एप्रिलला एक्सरे स्कॅनिंग मशिनव्दारे तपासणी केली असता बॉक्समध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी दोन लाकडी बॉक्समधील ९२ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान असा तीन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी मनींदर याने आरोपी आकाश पाटील याला एका बारदानच्या कापडामध्ये पार्सल पाठवले होते. डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या दिघी येथील गोडाऊनमध्ये रविवारी (दि. ३) बारदानाच्या कापडातील या पार्सलची एक्सरे स्कॅनिंग मशिनव्दारे तपासणी केली असता त्यामध्ये तलवार सदृश वस्तू आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी जप्त केल्या.