अंध आजोबांना घेऊन आजी फुटपाथवरच रहायची, नियतीने एके दिवशी आजींनाही केले अपंग...वायसीएमने मिळवून दिला मग 'सहारा'

अंध आजोबांना घेऊन आजी फुटपाथवरच रहायची, नियतीने एके दिवशी आजींनाही केले अपंग...वायसीएमने मिळवून दिला मग 'सहारा'

पिंपरी : एकुलता एक मुलगा सांभाळत नसल्याने वयोवृद्ध अंध नव-याला घेऊन आजी फुटपाथवरच भिक्षा मागून रहायची. रस्ता ओलांडताना एके दिवशी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवाल्याने आजीला उडविले आणि पळून गेला.खुब्यातूनच पाय मोडल्याने आजी अपंग झाली.आधीच निराधार अणि आता तर दोघेही विकलांग… जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने वायसीएम रूग्णालयाने अखेर आज त्यांना कायमस्वरूपी सहारा मिळवून दिला. तुकाराम चव्हाण (वय ७२)आणि ताराबाई चव्हाण (वय ७०) अशी या पती पत्नीची नावे आहेत.

गेली दहा वर्षांपासून पुणे - मुंबई महामार्गावर रात्र झाली की रस्त्याच्या कडेला दिसेल त्या जागेवर मुक्काम करायचा व दिवस काढायचे हेच त्यांचे जगण्याचं चक्र ठरलं होतं.आजोबा पन्नाशीत असतानाच मोतीबिंदूने त्यांना गाठलं.उपचार कसे करायचे,कोण करणार? यातच काही वर्षे लोटली.

मोतीबिंदू पिकला आणि आजोबांची कायमची दृष्टी गेली. तुकाराम आजोबा म्हणजे पहाडी आवाज असलेले तरूणपणातील नामवंत भजन गायक…! त्याच बरोबर तबला, हार्मोनियम, पखवाज, वीणा ही वाद्ये वाजवण्यात त्यांचा जबरदस्त हातखंडा..! म्हातारा आंधळा झाला म्हणून काय झालं, म्हातारीने मग हार मानली नाही..पदर खोचून तिने त्याला धीर दिला.नव-यात कला आहे तर त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होऊ शकतो हे ओळखून तिने गळ्यात पेटी अडकवून नव-याला घेऊन लोणावळा-पुणे लोकलमध्ये १३ वर्षे गाणी गात जगण्याचा प्रश्न सोडवला. गोड खाणं.. हा म्हता-याचा वीक पॉइंट असल्याने रोजची चिल्लर जमा झाली की कधी लाडू,कधी जिलेबी तर कधी बालूशाही हा त्यांचा ठरलेला मेनू..! ८ मार्च २०२० ला कोरोना आला अन् लोकलसेवा बंद झाली. जगण्याचा मार्गच थांबला. भीक देण्यासाठी माणसं पण रस्त्यावर नसल्याच्या त्या भयानक काळात आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील मंदिराने या जोडीला जगवलं.

येथील निराधारांना रोज कोणी ना कोणी जेवण घेऊन येतंच येतं..हा गेली पन्नास वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोना काळात या मंदिर परिसरातील भटकी कुत्री पण उपाशी राहिली नाही.कोरोना जवळपास आता संपला तरी दगदग व धावपळ करण्याचं त्राण नसल्याने या जोडीने आता महामार्गावरील फुटपाथ हेच आयुष्य निवडलं. नियतीला त्यांची ही विश्रांती बहुधा मान्य नसावी. मागील आठवड्यात अंध म्हता-याला घेऊन रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकीस्वारानं म्हतारीला उडविलं, कासावीस जीव झाला, म्हता-याने फोडलेला टाहो पाहून पब्लिक गोळा झाली.कोणीतरी पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाच्या दारात त्यांना सोडून गेलं. खुबा व गुडघ्याखालील हाड तुटल्याने प्लास्टर टाकावं लागलं. अपंगत्व तिच्या नशिबी आलं.तीन महिने आता प्लास्टर ठेवायचं असं सांगून डाक्टरांनी डिस्चार्ज दिला खरा मात्र आता जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण झाला असता वायसीएम मध्ये निराधारांचं सेवाकार्य करणारे रियल लाईफ रियल पिपल संस्थेच्या एन.एम.हुसैन यांनी मावळ तालुक्यातील कुसवली येथे असलेल्या सहारा वृध्दाश्रमाशी संपर्क साधला. अनाथ-निराधार आजी आजोबा यांना सांभाळण्याचं कार्य करणारे या वृध्दाश्रमाचे प्रमुख विजय जगताप यांनी वायसीएम मध्ये येऊन दोघांनाही आपल्या ताब्यात घेतलं.आजीची सेवा करणारा वायसीएमचा सारा स्टाफ आजींना निरोप द्यायला आला. कित्येक महिने गोड न खायला मिळाल्याने आजोबांची इच्छा हुसैन यांनी लाडू भरवून पूर्ण केली. म्हातारा आवडीनं लाडू खातोय हे पाहून वायसीएम सोडताना म्हतारीचं अश्रू मात्र काही लवकर थांबत नव्हते.