ख्रिसमस कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांची डान्स, मस्ती आणि धम्माल

ख्रिसमस कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांची डान्स, मस्ती आणि धम्माल
  • नाताळनिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजन

पिंपरी : ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांनी डान्स, मज्जामस्ती करीत धम्माल केली.

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या संकल्पनेतून पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी शनिवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत या ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

ख्रिसमस कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांची डान्स, मस्ती आणि धम्माल

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पी.के.स्कुलचे चेअरमन जगन्नाथ काटे, राजेंद्रनाथ जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

नेत्रदीपक रोषणाई आणि आकर्षक देखाव्यांनी उजळलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानात बालचमुंसाठी अनेक मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः सुप्रसिद्ध जादूगारांचे जादूचे खेळ बघून लहान मुलांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्याचे भाव पाहायला मिळाले. तर संगीताच्या तालावर डान्स करत मज्जाही केली. यावेळी संताक्लोजकडून उपस्थित चिमुकल्यांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली. व खाऊ वाटप देखील करून या भेटवस्तू मिळताच या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.

यावेळी बोलताना आयोजक कुंदाताई भिसे म्हणाल्या की, ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. महिनोंमहिने या दिवसाची मुलं आतुरतेने वाट पाहात असतात. याच उद्देशातून या चिमुकल्यांसाठी आम्ही या ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन केले आहे.

पालक शंकरराव पाटील व दिलीपकुमार शहा यांनी कुंदाताई भिसे यांचे कौतुक करताना म्हणाले की, उन्नती सोशल फाउंडेशन आणि कुंदाताई भिसे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सातत्याने पिंपळे सौदागरकरांसाठी ज्या पद्धतीने ते विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात त्यामुळे आपण येथील रहिवासी असल्याचा अभिमान आहे. त्यांच्यारूपाने एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी आम्हाला आगामी निवडणुकीत मिळेल याच आमच्या सदिच्छा आहेत.

दरम्यान, या कार्निव्हलचा आनंद लुटण्यासाठी पिंपळे सौदागरसह आसपासच्या परिसरातूनही हजारो नागरिक आपल्या चिमुकल्यांसह हजर राहिले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती सोशल फाउंडेशनचे सल्लागार सागर बिरारी यांनी केले.