सापाची अन्नसाखळीत खुपच महत्त्वाची भूमिका

सापाची अन्नसाखळीत खुपच महत्त्वाची भूमिका

गणेश भुतकर

साप म्हणले की माणूस त्या सापाकडे न बघता सुद्धा अतिशय घाबरतो ही माणसाची स्वाभाविक क्रिया आहे. सापांची भीती माणसाला कोणीही घातलेली नसुन ती आपल्या रक्तात आहे. पण साप खरोखरच इतके खतरनाक, भयावह, भीतीदायक किंवा उपद्रवी आहेत का❓ चला एक छोटासा आढावा घेऊन बघुया.

भारतात सुमारे ३५०+ सापांचे प्रकार आढळतात. त्यातील फक्त ५ ते ६ सापच विषारी असतात ज्यांच्या चावण्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

त्या प्रमुख विषारी सापांना भारतात Big Four म्हणून ओळखले जाते. त्यांची नावे नाग, फुरसे, घोणस आणि मन्यार पैकी आपल्या इथे फुरसे हा साप आढळत नाही. तसेच घोणस आता फक्त नदीच्या कडेला सापडतात. मन्यार फक्त रात्री बाहेर पडून सूर्योदयापूर्वी परत बिळात किंवा अडचणीत निघून जातो. राहता राहिला प्रश्न फक्त नागाचा तर नाग आपल्या वाकड, पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, हिंजवडी थोडक्यात सर्वत्र आहेत.

तसेच बिनविषारी सापांमध्ये मुख्यत्वे धामण, तस्कर (सोंगट्या), कवड्या, पट्टेरी कुकरी, दिवड (पाण्यातील विरूळा), धुळनागीन इत्यादी साप सापडतात. त्यात आपल्या सोसायटीच्या आवारात बर्याच दिवसांपासून एक बराच मोठा धामण जातीचा साप वास्तव्यास आहे. धामण जातीचा साप आपल्या आवारात असल्याने बरेच फायदे आहेत ते पुढील प्रमाणे.

१) पहीला फायदा तो विषारी साप नाही.

२) धामण सापाला इंग्रजी मध्ये Rat Snake असे म्हणतात. म्हणजे ज्या सापाचे मुख्य खाद्य उंदीर आहे असा साप. तो फुकट मध्ये सोसायटी आवारात पेस्ट कंट्रोल करतो.

३) आपल्या परीसरात नाग आणि मन्यार हे २ विषारी साप आढळतात. धामण साप हा सर्व प्रकारच्या सापांना खाऊन आपले पोट भरतात. तो स्वजातीय साप सुध्दा खातो. म्हणजे तो साप आपल्या आवारात असलेल्या सर्व प्रकारच्या सापांना खाऊन सापांचे पॉप्युलेशन कंट्रोल अतिशय उत्तमरीत्या करतो.

४) आपण तो साप पकडून दिला तर त्याच्या जाण्यामुळे रिक्त झालेली जागा घ्यायला तेथे परत दुसरा साप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५) भारतात कुठलाही प्रकारचा साप माणसांच्या मागे लागुन त्यांचा चावा घेत नाही. कळत नकळत आपणच चुकुन सापांच्या संपर्कात गेल्या नंतर होणाऱ्या विषारी सापांच्या चाव्यापैकी सुमारे ८०% चाव्यांमध्दे विषारी साप माणसाच्या शरीरात विष सोडत नाही. अशा चाव्यांना #Dry_Bite असे म्हणतात.

६) आपल्या भागात विषारी साप किंवा बिनविषारी साप बरेच आहेत पण कधी कुठे कोणाला साप चावण्याची घटना आपल्या ऐकण्यात आहे का❓साप चावुन मृत्यूची घटना तर फार दुर्मिळ गोष्ट आहे.

साप हा अन्नसाखळीत खुपच महत्त्वाची भूमिका पार पाडतो त्यात तो माणसांना काहीही अपायकारक नाही. मी सोसायटी मधील धामण सापाला माझ्या डोळ्याने पाहिले म्हणून धामण सापाला गृहीत धरून त्याच्या बद्दल हे फायदे समजावून सांगितले आहेत. पण कदाचित या ठिकाणी नाग असता तरीही आपल्याला मिळणारे फायदे तंतोतंत हेच आहेत. सोसायटी आवारात धामण आहे ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे.

माणसाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचेजे अपरिमित नुकसान या २० वर्षात केले आहे तितके नुकसान गेल्या २०० वर्षात सुध्दा केले नसेल. २० वर्षापूर्वी शेतजमिनी भरपूर प्रमाणात होत्या, माणसाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीला करोडो रुपयांचा भाव आला.

शेतकर्यांनी फास्ट_मनीसोर्स म्हणून जमीनी बिल्डरला विकल्या पण या ठिकाणी राहणार्या पशुपक्ष्यांनी कोठे जायचे❓ सातबारा माणसाच्या नावावर असतो पण तसे बघायला गेलो तर जमीनीवर प्रथम हक्क हा वन्य पशुपक्ष्यांचाच आहे.

या जगात माणुस सोडून प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे. माणुस नामशेष झाला तर पृथ्वीला काडीचाही फरक पडणार नाही पण इतर कुठलाही सजीव नष्ट झाला तर कुठेना कुठे निसर्गाचे नुकसान होते.

हा लेखनप्रपंच फक्त हे सांगण्यासाठी आहे की त्या धामण सापा एवजी कुठलाही विषारी साप असता तरीही तो माणसांना धोकादायक नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ९९७०६६८८८६ या नंबरवर कॉल करून विचारले तरी चालेल.