१५ वर्षांपुर्वी घरातून निघून गेलेल्या सासऱ्यास सुनेच पत्र

१५ वर्षांपुर्वी घरातून निघून गेलेल्या सासऱ्यास सुनेच पत्र

आदरणीय आप्पा , आज रोजी आपणास घरातून निघून जाऊन १५ वर्षे पूर्ण झाली. आपण कशा अवस्थेत असाल हे परमेश्वरच जाणे. या वर्षात आपल्या आठवणीशिवाय एक दिवसही गेला नसेल.माणूस अवती भवती असताना त्याची किंमत कुणालाच कळत नसते, तो गेल्यावर रान सैरभैर होते. किती प्रयत्न केला सुधारणा कराव्याशा वाटल्या तरी काहीच उपयोग नसतो हे खरेच. आज जबाबदारी पेलताना दमछाक होताना तुमच्या होत असलेल्या ओढातानीची जाणीव होते. या कुटुंबात मला सामील करण्यात तुमचाच पुढाकार होता. मला कायम तुम्ही सूनेऐवजी मुलगीच मानलीत, मुलगी मानन अन् प्रत्यक्षात वागणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. या घराच्या चाली रिती तुमच्यामुळेच मला कळाल्या, सगळ्यानच्या म्हणन्या प्रमाणे होतेच मी तुमची लाडकी.

पैसा हा जगण्यास आवश्यक असतो. असेल तर अडचण अन् नसेल तरी अडचण.. तुम्ही आयुष्यभर सायकलवर फिरून कमावलेलं वैभवाचा सारेच आस्वाद घेत असताना तुम्ही मात्र तुमच्या कष्टाची फळे चाखायला अनुपस्थित आहात याचेच वाईट वाटते. साधी राहणी उच्च विचार सरणी, प्रामाणिकपणा, निरागसता, काम करवून घेण्याची कला, परोपकार वृत्ती, आध्या त्माची ओढ , जे पोटात तेच ओठात यावर ठाम राहण्याची सवय असे अनेक गुण तुमच्यात होते. तुमच्या जाण्याची अनेक कारणेही असतील तुम्हास समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडले असू अन् त्यामुळेच कदाचित तुमच्या आणि आमच्या विचारांची दरी रुंदावत गेली असेल.

कुटुंबात काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडल्या असतील, तुम्हाला झालेली एकटेपणाची भावना, कुटुंब चालवत असताना होत असलेली तुमची फरपट, वयानुसार कुटुंबाचा डोलारा सावरण्यास येत असणारी तुमची असमर्थता अशी अनेक कारणे असू शकतीलही. तुम्ही असताना सर्व जबाबदारी पेलत होतात. तुमच्या मायेच्या विस्तीर्ण पंखाखाली आम्ही निवांत होतो. आप्पा आहेत तर कोणतही संकट आले तर तुम्ही आहात या एकाच कल्पनेने मनात उभारी येत होती. तुमच्या जाण्याने क्षणात सुखाचे घरटे कोलमडून गेले. संकटाची आलेली हळुवार झुळूक देखील मनास कासावीस करत होती. तुमच्या अचानक जाण्याची भावना मनास बैचेन करत होती.

सुरुवातीची सात वर्ष तर खूप कष्टप्रद गेली. जाताना दोन दोन सर्व्हिस करणारा माणूस अंगावरील वस्त्रानिशी काहीही न नेता गेला याचेच वाईट वाटते. काळ सर्व जखमा भरून काढतो पण आपल्या नसण्याची जखम कशी भरून काढावी याचे उत्तर कोणाकडे बरे सापडेल? आज वाय फाय, इंटरनेट च्या जमान्यात माणूस कुठे का असेना तो आपल्या स्वकियांशी जोडलेला आहे. तुमच्याशी जोडण्यासाठी कोणतं वाय फाय,इंटरनेट जोडावं हेच मुळी कळत नाही. झालेल्या भरलेल्या जखमांची ढपली काढण्यात काहीच मजा नसते पण तुमच्या नसण्याचे नुकसान कसे बरे भरून काढावे. दोन ध्रुवा वरील सजीव मानव सृष्टीवर तुमचा ठावठिकाणा कोठे घ्यावा? आज तुमच्या कष्ट रुपी झाडाची फळे आम्ही चाखत आहोत आणि त्यात काही नवीन गोष्टींची भर देखील घालत आहोत.

समाजात वावरताना आपल्या घरातील सदस्य म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. काका चांगले व्यक्ती होते असे ऐकावयास मिळते. आपणास सांगण्यास आनंद होतो की घरातील सर्वजण खुशाल आहेत. घरात नवीन सदस्य सुद्धा आले आहेत. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले तुम्ही एका अनोळखी ठिकाणी येऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली मुलाबाळांसाठी फूल नाही पण फुलाची पाकळी या म्हणीप्रमाणे त्यांच्यासाठी करून ठेवलं मायेचं हक्काचं छप्पर निर्माण केलं पण मी माझं आणि माझ्या स्वकमाईच असा रुबाब कधी दाखविला नाही. घरात आपण सर्वांसाठी असतो पण सर्व आपल्यासाठी असतीलच असे नाही. आज मितीस या जगात तुम्ही आहात की नाही हे आम्हीसुद्धा छातीठोकपणे सांगू शकत नाही. आज ना उद्या तुम्ही येणार येणार ही भाबडी आशा ठेवून आजवर खूप वाट पाहिली आणि आज देखील तुम्ही जरूर याल हीच आशा बाळगून वाटचाल करीत आहोत.

– आपली लाडकी सूनबाई सौ. सीमा मोहिते