उशीरा उठते व स्वयंपाक नीट येत नसल्याने विवाहितेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून तीने संपवले जीवन

पुणे : नीरा-देवघर धरण खो-यातील गुढे (ता. भोर) येथील रेखा संतोष ढवळे (वय २८) विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. शनिवारी ( ता. २०) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी भोर पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा व संतोष यांचे २०१२ साली लग्न झाले होते. तेंव्हापासून तिची सासू, सासरे व नणंद हे तीला उशीरा उठते, स्वयंपाक नीट येत नाही असे बोलून तीचा शारिरीक व मानसिक छळ करीत होते. पती संतोष यास ही बाब सांगितल्यानंतर तोही तीला सतत मारहाण करीत असे. त्यामुळे अनेक वेळा ती माहेरी येत होती.

परंतु तिचा भाऊ व माहेरकडील मंडळीं त्यांच्यामध्ये समेट घडवून आणत. सासरी गेल्यावर पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरचा फोन घेण्यास विरोध करीत मारहाण करीत असे. मागील आठवड्यात तीने चुलतभावास मला सासरच्यांनी जगने मुष्किल केले असल्याचे सांगितले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी रात्री विषारी औषध पिवून आत्महत्या केली.

रेखाचा भाऊ आनंता किंद्रे (रा. रायरी, ता. भोर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रेखाचा पती संतोष ढवळे, सासू जनाबाई ढवळे, सासरे जगन्नाथ ढवळे व नणंद पूनम ढवळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.