पेशवे पार्क येथे अक्षर मित्र वाचनालयाचे उद्घाटनमुले रमली गोष्टी अन् कवितांच्या सप्तरंगी कल्पना विश्वात

पेशवे पार्क येथे अक्षर मित्र वाचनालयाचे उद्घाटनमुले रमली गोष्टी अन् कवितांच्या सप्तरंगी कल्पना विश्वात

पुणे : कोरोनामुळे बराच काळ घरात अडकलेली लहान मुले आता हळुहळू वेगवेगळ्या निमित्तांनी बाहर पडू लागली आहेत. आज तर पुण्यातील पेशवे उद्यानात मुलांना खेळण्या बागडण्याबरोबर कवितेसह गोष्टीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आणि त्या सप्तरंगी कल्पना विश्वास मुले भान हरपून रमून गेली.

निमित्त होते पुणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेशवे पार्क येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत अक्षर मित्र वाचनालयाच्या उद्घटनाचे. पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अ.भा.बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.संगीता बर्वे यांनी भूषविले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका रेणूताई गावस्कर, बाल साहित्यक राजीव तांबे, नगरसेवक धीरज घाटे, पुणे मनपा उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, नाट्य संस्कारचे प्रमुख प्रकाश पारखी, पुस्तकमित्र प्रसाद भडसावळे, दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे, ग.म.भ.न. प्रकाशनाचे प्रमुख ल.म. कडू आणि जयदीप कडू, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, 60 वर्षांपूर्वी पेशवे उद्यानात सुरू झालेल्या फुलराणीला हिरवा झेंडा दाखवीणारे सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर, केतकीबोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. संगीता बर्वे यांनी ‘पुस्तकं नसतात केवळ कपाटात ठेवण्यासाठी’ ही कविता साभिनय सादर केली. राजीव तांबे यांनी ‘प्रेमळ भूत’ ही गोष्ट सांगितली.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हा उपक्रम केवळ पेशवे पार्क उद्यानापुरता मर्यादित न राहता पुण्यातील सर्व उद्यानांमध्ये हा उपक्रम सुरू केला पाहिजे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धींगत होण्यास मोठा हातभार लागणार आहे. कारण लहान वयात वाचनाचे संस्कार झाले, तर भविष्यात त्याचे निश्चितच सवयीत रूपांतर होते. वाचनाच्या सवयीमुळे व्यक्तीमत्वाला चांगली धार आणि आयाम प्राप्ता होतात.

यावेळी बोलताना रेणू गावस्कर म्हणाल्या की, लहान वयात मुले निर्भय आणि निष्पाप असतात. आपल्या मोठ्यांना देखील निर्भय बनविण्याची त्यांच्यात ताकद असते. मुले आपल्याला धीट करतात. कधी कधी आपणच या मुलांची मुले होऊन जातो, याचा मी अनुभव घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले, निकीता मोघे यांनी आभार मानले.