काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी

काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी

काळेवाडी : मागील सात वर्षांपासून लकी बेकरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमएम चौक) हा काळेवाडी मुख्य रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी लवकरात लवकर काँक्रीटीकरण करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर व इरफान शेख यांनी केली आहे.

मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी ते वाकड, हिंजवडी, ताथवडे, थेरगाव, रहाटणी, चिंचवडगाव आदी उपनगरांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. मात्र, ड्रेनेज लाईन, स्टॉम वॉटर लाईन (पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहीनी), पदपथ या रस्त्यावर नाही. त्यामुळे असंख्य अडचणींचा सामाना नागरिकांना करावा लागतो.

सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी ब प्रभागाच्या झोन अधिकारी सोनम देशमुख यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही काळेवाडीचे कायम स्वरुपी रहिवाशी असून नियमित शासकीय, निमशासकीय कर भरतो, मतदानाचा हक्क देखील बजावितो. तरीही ही असुविधा का? सुविधा पुरवाव्यात अन्यथा आम्हाला कर मुक्त करावे. अशी थेट मागणी शेख यांनी केली आहे.

काळेवाडीतील हा मुख्य रस्ता आजतागायत विकासापासून वंचित आहे. महापालिकेकडून मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सामान्य नागरिक महापालिकेला कर भरतो. मात्र, काळेवाडीतील नागरिकांना कराच्या बदल्यात सुविधा मिळतात का? याचा विचार होणे गरजेचे आहे. आम्ही या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

– सुनिल पालकर, शिवसेना नेते


हा वर्दळीचा रस्ता दरवर्षी बजेटच्या प्रतिक्षेत असतो, आगामी बजेटमध्ये या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव दाखल व्हावा त्याबरोबर ड्रेनेज लाईन, एमएनजीएल गॅस लाईन टाकण्याची योजना आखावी, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ, पर्यावरण नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूने १० फूट अंतरावर झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाणे गरजेचे आहे.

– इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते


रस्त्याचे काँक्रिटीकरण व इतर आवश्यक वाहिन्या प्राधान्याने टाकणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. काळेवाडीतील रहदारीच्या दृष्टीने या रस्त्याचे तातडीने काम झाले पाहिजे. ही आमची आग्रहाची मागणी आहे.

– सुधाकर नलावडे, शिवसेना उपशहरप्रमुख