किडनॅपिंग ऑफ स्नेक्स

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स
अल्बिनो साप

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स? हा काय विचित्र प्रकार आहे ! असाच विचार आला ना मनात, तर चकित होऊ नका अशाही गोष्टी समाजात आहेत. भारतात तब्बल ९१००० पेक्षा जास्त प्रकार चे प्राणी आहेत, या हजारो वन्यप्राण्यांतील एक असा प्राणी आहे जो मनुष्यवस्तीत देखील आढळतो. समाजात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वागणूक मिळते , काहीठिकाणी त्याला परिसरात आढळल्यास हुसकावून लावतात, काहीठिकाणी त्याला पकडून दुसरीकडे सोडण्यासाठी मदत बोलावली जाते तर काही ठिकाणी बघताक्षणी त्याला मारलेही जाते, तो म्हणजे साप.

सापाला इतिहासात व धर्मग्रंथात वेगवेगळ्या रूपात काही ठिकाणी सकारात्मक तर काहीठिकाणी नकारात्मक स्वरूपात रेखाटले गेले आहे. सापांविषयी समाजामध्ये बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. भारतात सापांच्या २८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत, समाजात साप हा कुतूहलाचा विषय आहे. साप पाहताच काहींच्या अंगाला शहारे येतात तर काही उत्सुकतेने या अनोख्या व निराळ्या प्राण्यांकडे एक टक बघतच राहतात. बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी साप आल्यानंतर अशी काही गर्दी होते कि असे वाटते कि त्यातही ठिकाणी कोणी सेलेब्रिटी अली आहे कि काय ! सर्वांनी फोटो काढण्यासाठी मोबाईल बाहेर काढलेले असतात, अशाच या सुंदर लक्षवेधी प्राण्याला त्यांच्या अनोखेपणामुळे बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते.

वेगवेगळ्या सापांचा वेगवेगळा अधिवास असतो काही शहरात, काही डोंगराळ भागात, काही वाळवंटात, समुद्रात, माळरानांत तर काही वर्षावनात. साप विविध रंगात व विविध लांबी रुंदीत आढळतो, प्रत्येकाशी एक नवीन ओळख आहे. या सापांशी सर्वात जास्त जवळीक साधणारे व समाजात ‘स्पेशल वन’ म्हणून ओळखले जाणारे म्हणजे ‘सर्पमित्र’ होय.

सापांजवळ सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही परंतु सर्पमित्र अगदी त्याला हातात पकडून सुरळीतरित्या पिशवीत टाकतो आणि लांब जाऊन सोडून येतो. सर्पमित्रांचे काम अतिशय जोखमीचे आहे व समाजासाठी आणि निसर्गासाठी मोठे योगदान देणारेही परंतु काही सर्पमित्र सापांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मित्र पेक्षा शत्रूची भूमिका बजावतात.

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स
किंग कोब्रा

काही सर्पमित्र साप बघण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जातात आणि त्या अनोख्या सापाला पकडून आपल्या घरी घेऊन येतात या सापांबरोबर तो व त्याचे जोडीदार वेगवेगळ्या पद्धतीने हाताळून फोटो काढतात, मनाला वाटेल तेव्ढ्यादिवस घरी डांबतात त्यांचे फोटो पाहून इतर भागातले सर्पमित्र त्याची मागणी करतात, मग हा साप तिकडे नेण्यात येतो परत त्याच पद्धतीने त्याबरोबर फोटो काढून नंतर पुढील टोळी कडे. अशा प्रकारे साप इकडून तिकडे फिरतच राहतो , या सर्वांत त्याचा आहाराचा व त्याच्या प्रकृतीचा कोणीही विचार करीत नाही, त्याची प्रकृती खराब झाल्यास त्याला जवळपासच्या परिसरात सोडण्यात येते व ते ठिकाण या सापाचा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे तो जास्त दिवस जगात नाही बऱ्याचदा साप या प्रवासातच मृत्युमुखी पडतो.

हे स्वयंघोषित प्राणीप्रेमी स्वतःच्या स्वार्थसिद्धी साठी एका सुंदर प्राण्याला त्याच्या राहत्या घरातून पकडून गाडीत टाकून शेकडो मैल दूर आणतात त्याला कित्येक जण चुकीच्या पद्धतीने हाताळतात, त्या बरोबर छायाचित्र काढतात व त्याला मरणाच्या दारात सोडून देतात. हा प्रकार म्हणजे किडनॅपिंग करून विनयभंग करणेच होतो ना ? बहुदा या किडनॅपिंग चे शिकार अल्बिनो साप (Albino Cobra अत्यंत दुर्मिळ रंगहीन पांढरे साप ), किंग कोब्रा (King Cobra), भारतीय अजगर (Indian rock Python), तसेच वेग्वेगळ्या राज्यांतील दुर्मिळ प्रजाती होतात. काही तर देशाबाहेरून देखील अवैध्य रित्या साप आणतात.

एका सुंदर प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासातून पकडून, लांब आणून बंधिस्त करून त्याचे हाल करणे अत्यंत निंदनीय आहे तसेच त्याला डांबून ठेवणे कायदयाने गुन्हा देखील आहे. असे हे स्वयंघोषित सर्पमित्र वन्यजीव सौरक्षण व संशोधन क्षेत्र आपल्या अमानवी कृत्याने कलंकित करण्याचे कार्य करतात.

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स
भारतीय अजगर

खरे पाहता ‘सर्पमित्र’ याची परिभाषाच कोणाच्या लक्षात अली नाही, सर्वांना वाटते सर्पमित्र होणे म्हणजे खूप अवघड आहे, आपल्या परिसरात या संदर्भात तीन विभिन्न प्रकारे कार्य करणारी मंडळी आहेत. एक म्हणजे गारुडी, दुसरा सर्परक्षक आणि तिसरा म्हणजे सर्पमित्र. यातला गारुडी म्हणजे अकुशल पद्धतीने साप पकडून त्याला डांबून, प्रदर्शन करून पैसे कमावतो, परंतु सर्परक्षक सापाला काळजीपूर्वक पकडतो, जर सापाला दुखापत झाली असेल तर तो उपचार देखील करतो आणि त्यानंतर सापाला योग्य अधिवासात मुक्त करतो.

साप हा जैवसाखळीतील अत्यंत महत्वाचा घटक आहे, निरनिराळ्या पद्धतीने तो मनुष्याला मदत करतो, त्याचे आपल्या पूर्वीपासून याठिकाणी वास्तव्य आहे व तो आपल्या परिसरातील एक अविभाज्य घटक आहे, या सापांना आपल्याबरोबर समाजातील भाग म्हणून स्वीकारणारा व आणीबाणी च्या समयी सर्परक्षकाला बोलावून त्याचे प्राण वाचवणारा हा ‘ सर्पमित्र ‘ होय. आज निसर्ग सौवर्धनासाठी जागरूकता आणि प्रबोधनाची गरज आहे आणि सर्वसामान्यांतील सर्पमित्र जागृत झाला तर या मनवेधक प्राण्याचा सौवर्धनाला मोठा हातभार लागू शकतो.

– शुभम पांडे

संस्थापकीय अध्यक्ष

वर्ल्ड फॉर नेचर

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स