
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड नव नगर विकास प्राधिकरण यांनी नागरिकांमधील क्रीडा कौशल्ये विकसित व्हावी, यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून क्रीडांगणे उभारली आहेत. त्यांची योग्य देखभाल व जपणूक करणे ही क्रीडा विभागाची जबाबदारी आणि प्रथम कर्तव्य आहे. मात्र, या क्रीडांगणांची भयंकर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अशी क्रीडांगणे मातीमोल करणाऱ्या संबंधित क्रीडा अधिकारी आणि सुपरवायझर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नुकतेच मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर नऊमधील बास्केटबॉल ग्राउंडला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ज्या बाबी निदर्शनास आल्या, त्या अतिशय भयंकर, संताप आणणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाच्या असून त्या खालीलप्रमाणे.
१) सदर ग्राउंड हे दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे.
२) सदर ग्राउंड म्हणजे कचरा डेपो तयार झालेला आहे.
३) सदर ग्राउंड हे कुत्र्या मांजरांचे आणि भटक्या जनावरांचे आश्रयस्थान झालेले आहे.
४) सदर ग्राउंड मध्ये अस्तित्वात असणाऱ्या इमारतिची अवस्था अतिशय भयंकर व दयनीय झालेली आहे.
५) सर्वत्र खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत जाळ्या तुटलेल्या आहेत.
६) एमएससीबी चा डीपी पूर्णपणे उघडलेला व धोकादायक स्थितीत आहे
७) जागोजागी कचरा जाळण्यात आलेला आहे.
८) आजूबाजूच्या परिसरात जंगली वनस्पती व रोपटी भयानक भयंकर प्रमाणात वाढलेल्या आहेत.
९) ग्राऊंडच्या अंतर्गत भागातील विद्युत पोल वरील दिवे खाली पडण्याच्या स्थितीत दयनीय अवस्थितीत उभे आहेत.

अत्यंत खेद वाटतो की, सदर क्रीडांगणाची देखरेख व जपणूक करण्याची जबाबदारी ज्या सुपरवायझर व त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ज्या क्रीडा अधिकारी यांच्याकडे आहे त्यांना मनपा फक्त ऑफिसमध्ये खुर्चीत बसण्याचा पगार देते काय असा आमचा प्रश्न आहे.
सदर क्रीडांगणाच्या देखरेखीसाठी संबंधित क्रीडाअधिकारी व सुपरवायझर यांनी या ग्राऊंडला किती वेळा भेट दिली तसेच सदर ग्राउंड मधील झालेल्या नुकसानीबाबत संबंधित विभागांना काही पत्रव्यवहार सुपरवायझर यांनी केला असेल तर तो पाहण्यासाठी आम्ही लवकरच क्रीडा विभागाला भेट देणार आहोत.
आपण तात्काळ सदर क्रीडांगणाच्या दुरावस्थेला व लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या या क्रीडांगणाला मातीमोल करणाऱ्या आणि आपली जबाबदारी आणि शासन कर्तव्यात कसूर करणार्या संबंधित सुपरवायझर व क्रीडा अधिकारी यांच्यावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही. निवेदनावर अध्यक्ष नितीन यादव व सचिव उमेश सणस यांच्या सह्या आहेत.