कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावरुन मोदींचा समाचार घेतला. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी देखील मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामगिरीची माहिती संपूर्ण देशाला आहे. देशानं त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या, असं दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रात म्हटलं आहे. ‘मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं इतकी खालची पातळी गाठली नव्हती,’ अशा कठोर शब्दांत शिक्षकांनी मोदींचा निषेध केला आहे. शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेलं हे पत्र काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी ट्विट केलं आहे.

उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवर देखील टीका केली. ‘तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. ‘मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.