शेतकरी नावाची बाप माणसं

शेतकरी नावाची बाप माणसं

नितीन थोरात

शेतकरी नावाची माणसं माहितीयेत? अत्यंत वाईट जमात. यांच्यावर कितीही अन्याय करा. तरीही ही शेती करतातच. स्वत:चं आणि दुनियेचं पोट भरायची कसली हौस असते यांना ती त्यांनाच माहिती?

ऊन ४५ डिग्रीवर गेलं की मी तर बाबा एसीमध्ये बसून राहतो. पण, ही अडाणी माणसं अशा उन्हातपण रानात सऱ्या तोडताना दिसतात. काळवंडतात. करपतात. पार भाजून निघतात. पण, धान्य पिकवायच्या मागं लागलेली असतात.

मरणाची थंडी पडते, तेव्हा मी मस्त ब्लँकेटमध्ये लोळत पडतो. उबदार कानटोपी, स्वेटर घालून टीव्ही पाहतो. पण, शेतकरी नावाची गयबानी लोकं अशा थंडीतपण पाटात उभी असतात. यांच्या पायाला मुंग्या येतात. गारठून पाय बधीर होतात. दगडाची चिपळी सर्रकन पाय कापून टाकते अन् पाण्यासोबत रक्ताची धार वाहू लागते. तरी यांना फिकीर नसते. कारण यांना दुनियेचं पोट भरायचं असतं.

परवाच्या पावसात तर मी गॅलरीत बसून मस्त फोटो काढले. वाफाळता चहा घेत कविता केल्या, रोमँटीक गाणी म्हणलो. ही शेतकरी लोकं तशी नव्हती. उभं पिक वाचवता येईल या भाबड्या अपेक्षेनं सोसाट्याच्या वाऱ्यातही ही माणसं रानात पोहचली. डोक्यावरचा काळा डोह धो धो बरसला आणि ही मंडळी डोक्याला हात लावून बांदावर बसली. त्यांनी डोळ्यादेखत बांध फुटताना पाहिला. डोळ्यातलं तळं पुसत शेतातलं तळं बघितलं. वाहून चाललेलं सोयाबीन, भिजलेला कापूस, नासलेली केळी, सडलेली बाजरी, कांदा, द्राक्ष, तांदूळ अशी हातातोंडाशी आलेली हजारो पिकं बघत ही माणसं निर्जीव होऊन गेली.

त्यांना आता सजीव करण्याची जबाबदारी आपलीहे. अडाणी असली तरी देवमाणसंहेत. भोळी असली तरी आपली बापमाणसंहेत. त्यांना आता मदतीची गरजहे. सरकारने ठरवलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील.

आपला पक्ष, आपला धर्म, आपली जात, आपला जिल्हा सगळं विसरुन आपण आपल्या बापासाठी उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यात आपण आपला बाप शोधला पाहिजे