७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने : भारतीय विरुध्द अभारतीय

७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने : भारतीय विरुध्द अभारतीय

महेंद्र अशोक पंडागळे

बा भीमा तुझे ह्या देशावरचे उपकार कधीही न फिटणारे आहेत, ज्या देशाने आणि देशातल्या लोकांनी तुला शाळेबाहेर बसवले, सेंटीमीटर वरून नाही तर फुटांवरून पाणी दिल तेही त्याना वाटेल तेंव्हा, तुला बडोद्यात घर नाकारणारे सुद्धा हेच, आणि तू चवदार तळ्याचं पाणी चाखल्यावर ते तळ शुद्ध करणारे सुद्धा हेच,

बा, तू लढला होतास स्पृश्य स्त्रियांच्या बरोबरीच्या हक्कांसाठी पण तिथंही त्या ब्राह्मण, वैश्य आणि शूद्रांच्या स्त्रियांना तुझा अभिमान वाटला नाहीच,

पण आज त्या तुझ्याच मुळे, भयावह अश्या जागतिकीकरनाच्या युगानंतर भांडत आहेत, जमिनीवरची NOC देण्यास नकार देत आहेत बापाच्या मालमत्तेवर बरोबरीने हक्क सांगत आहेत इथेही तूच त्यांच्या कामी आलास,

आणि तेंव्हाही तूच होतास जो ज्योतिबांचा आणि आई सावित्रीचा वैचारिक पुत्र ज्याने अडलेल्या नडलेल्या सगळ्या स्त्रियांना मातृवाची भर पगारी रजा कायद्यात मंजूर केली.

बा, तूच तर आहेस ज्याने कारखाना कायदा आणून कामगारांचे कामाचे तास कमी केलेस, त्याना विमा संरक्षण दिलंस, त्याना PF, Gratuaty, बोनस, ओव्हरटाईम हे सगळं सगळं देऊन देशातल्या कामगारांची कायमची व्यवस्था केलीस.

तरीदेखील तुला या देशातले मुख्य उद्योग अर्थात बँका, विमा, विमानतळ, पोलाद, कोळसा, खाणी, खनिज, रेल्वे खाजगी होऊ द्यायचे नव्हते पण आता हे सगळ सगळं खाजगी झालाय आणि आता तू जे बोलत होतास आणि आम्ही तुझं वाचून समजून उमजून आकलन करून जे आज बोलतोय तेच होतंय आज देश देशोधडीला लागलाय, खाजगिकरणाने आमच्या आरक्षण वाल्यानाच फरक पडलाय अस नाहीये तर सगळेच लोक आज धंद्याला लागलेत ते केवळ आणि केवळ तुझ्याच विचारांना समजून न घेतल्यामुळे.

बा, तूच आजही देशातला सगळयात जास्त शिकलेला आणि शिकवणारा विध्यार्थी शिक्षक होतास आणि आहेस याची जाणीव आज कुठे JNU आणि इतरांना व्हायला लागलीय, जेव्हा की कोलंबिया विद्यापीठाने तुला कधीचाच 100 वर्षातला सर्वात हुशार विध्यार्थी म्हणून गौरवले होते.

बा, तुझा व्यासंग केवळ वाचनाचा, अभ्यासाचा नव्हताच कधी, तू त्या सगळ्यांतून पुढे जाऊन जागतिक दर्जाचा इतिहास संशोधक झालास आणि तू देशाचा इतिहासच बदलून टाकलास मग पुढं जाऊन शूद्र पूर्वी कोण होते, जाती निर्मूलन ते रिडल्स इन हिंदुइझम हा सांस्कृतिक खणखणीत संशोधनाचा बुद्ध फुले यांचा वारसा देखील तुझाच,

तू इतक्यावर थांबला नाहीसच तू त्या पुढं जाऊन पत्रकारितेत बहिष्कृत असलेला भारत दाखवलास, आणि त्याच बहिष्कृत भारताच डेस्टिनेशन प्रबुद्ध भारत आहे हे लेखनातून, कृतीतून दाखवून दिलंस.

बा आजवर अनेक विचारवंत हे समाजीक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बाप ठरलेत पण तू त्यांच्याही पुढे जाऊन अर्थशास्त्रात सुद्धा बाप झालास, प्रॉब्लेम ऑफ रुपी, स्मॉल होल्डिंग आणि पाण्याचे नियोजन करून तू जागतिक दर्जाचा शेती आणि जलतज्ज्ञ सुद्धा झालास.

बर हे सगळं इथपर्यंत ठीक होत पण देश स्वतंत्र झाला इतक्यापर्यंत तू गोलमेज परिषदा गाजवून कामगारांची चळवळ सुद्धा सुरू केली होतीस त्याच रूपांतर स्वतंत्र मजूर पक्षात झालं होतं,

तुझी राजकीय भूमिका पुणे कराराच्या रूपाने आजही आम्हाला नीटपणे समजली नाहीये तरीही तू एकेक मैलांचे दगड तयार करतच होतास,

अश्यातच भारत स्वतंत्र झाल्यावर त्याची स्वतंत्र अशी घटना लिहिण्याची जवाबदारी तुझ्या सकट इतरांवरही आली, पण तू Drafting कमिटीचा चेअरमन होतास आणि हा हा म्हणता लोक त्यातून बाहेर पडत गेले कोणी मेले कोणाचे काय झाले पण तू तिथेही सुर्याप्रमाणे अढळ राहिलास,

इतक्या कमी दिवसांत तू घटना लिहिली सुद्धा हे लोकांना माहीत आहेच पण घटनेच्या एकएक पानांचं त्यातल्या ओळींची अशी चिरफाड होत असताना ती ओळ ते पान आणि त्याचा अर्थ तू इतक्या सहजपणे आणि शांततेत मांडायचा म्हणूनच तर तुला मी आधुनिक बुद्ध समजतो.

आज मागे वळून बघताना constitutional debate वाचून आणि समजून घेणं हे ज्यांनी केलंय त्यालाच तुझी देशाबद्दलची तडफड, जाणीव आणि प्रज्ञेची जाणीव होईल, तुझ्याशी हा देश कसा वागला आणि तू देशाशी कसा वागला यातच तुझ्यातल्या मानवतेची, प्रज्ञेची, करुणेची, शिलाची, समाधीची आणि तुझ्यातल्या पारमितेची जाणीव स्पृश्य आणि अस्पृश्याना झाल्याशिवाय राहणार नाही.

आज या सगळ्या गोष्टींची आठवण आली कारण आज देश आधीसारखा गरीब फटका परंतु सुखी असताना अचानक नव्हे तर ठरवून जाणीवपूर्वक देशात खाउजा(LPG), SEZ, नोटबंदी, 370, GST, सरकारी कंपन्यांना बंद पाडणे, सक्तीचा VRS आणि आता CAA आणि शेतकऱ्यांच्या विरोधात एक नव्हे तर तीन जाचक कायदे आणून देशातील शेतीवर, अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर झालेल्या परिणामांना झाकण्यासाठी देशात हिंदू विरुद्ध मुस्लिम विरुद्ध इतर धर्मीय तेढ निर्माण करणं आणि काहीही करून तस होत नाही कळल्यावर केंद्राच्या माध्यमातून राज्यांची मुस्कटदाबी करणं, विद्यापीठात विध्यार्थी पालक आणि शिक्षकांवर जीवघेणे हल्ले करन, आसाम पेटता ठेवणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर,

आज लोकांना तू दिलेली सामाजिक समता आठवत आहे, तू दिलेला समतावादी मताधिकार आठवतोय, तू दिलेले मूलभूत अधिकार आठवत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाशी खातात हे ज्यांना कळत नव्हतं त्याना देखील आता तूच आठवत आहेस,

सगळ्या मोर्च्यांमध्ये तूच दिलेल्या संविधानाच्या उद्देशीकेची प्रत लोक घेऊन फिरत आहेत, तूच दिलेल्या We The People Of India हा राष्ट्रवादी नारा लोक जोरजोराने उच्चारत आहेत.

बा, यातले काही वर्षानुवर्ष भारताला हिंदुस्थान हिंदुस्थान अस म्हणायचे त्यांनी आता तू लिहिलेलं भारतीय संविधान वाचायला सुरुवात केलीये आणि त्यातला आर्टिकल 1. मध्ये India is भारत अस वाचल्यावर त्याना सुबुद्धी येत आहे, आणि त्यामुळेच India Independance Act म्हणजे काय ???

15 ऑगस्ट 1947 चा स्वतंत्र दिन आणि 26 जानेवारी 1950 चा प्रजासत्ताक दिन यातला फरक कळतोय.

पण बा,

आता खूप उशीर झालाय, ज्या लोकांनी नागरिकत्वाचा कायदा आणि त्याच गांभीर्य समजून काळाच्या पुढची पावलं टाकायला हवी होती ती लोक नेहमीप्रमाणे गाफील राहिले तू दिलेली संसदीय लोकशाही नीटपणे न समजल्यामुळे राज्यसभा काय असते त्यात आपलं प्रतिनिधित्व कस जात हे न कळाल्यामुळे राज्यसभेत हे विधेयक संमत झालं आणि उशिरा जाग आल्यामुळे या विधेयकवरून पुन्हा एकदा देश स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे लाखोंच्या संख्येने रस्त्यावर आलाय कारण रक्ताचा एकही थेंब न सांडता तू दिलेली संसदीय लोकशाही ह्यांना कधी कळलीच नाही, ह्या लाखो मेंढरांचा आजवर आपल्या पक्षांवर आणि नेत्यांवर अंकुशच नाही त्यामुळे काहीलोक खुशाल मतदानाच्या दिवशी राज्यसभेत गैरसमज राहिले, ज्यांना देशाची काळजी आहे असे विरोधी पक्ष आणि नेते आकड्यांच्या जुळवाजुळवी साठी साधी बैठकही घेऊ शकले नाहीत अश्यांसाठी आज माझ्याकडे तरी शब्द नाहीत.

देशव्यापी प्रश्न राज्यात राहून सुटत नसतात इतकं साध कळायला सुद्धा आज 72 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतोय ह्या बौद्धीक दिवळखोरीला बुद्धाच्या तत्वज्ञानात किंवा शिकवणुकीत स्थान आहे काय ???

या आणि अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या कामात नेमका आज 26 जानेवारी आला आणि तुझी आठवण झाली…..

बा, माझे प्रश्न खूप शूद्र आहेत रे, तू तर आमचा बाप तू त्या काळात कोणीही सोबतीला नसतांना, क्षुल्लक साधनासह इतक्या मोठ्या शत्रूसोबत लढलास आणि आम्ही तू ज्ञानाची, प्रज्ञेची, धम्माची, विचारधारेची, संसदीय लोकशाहीची अभेद्य अशी कवच कुंडल देऊन सुद्धा आम्ही हारतोय त्यात दोष आमचाच आहे.

येणाऱ्या माहिन्याभरात देशाच्या नागरिकत्वाचा निकाल लागणारच आहे तेंव्हा एकतर तुझं संविधान आणि आम्ही जिंकू नाहीतर आम्ही जर हरलो तर तुझं संविधान सुद्धा कदाचित या देशात नसेल आणि म्हणूनच आम्ही उशिरा का होईना लढयाला तयार झालोय खरं अनंत अडचणी आहेतच पण लढायचं ठरलंय, आणि जिंकायचं सुद्धा ठरलंय पण आता जरी जिंकलो आणि जिंकण्याच्या उन्मादात तुला वाचायचं आणि समजून घेण्याच विसरलो तर मात्र मरण अटळ आहे इतकं नक्की….

बा भीमा, तुला, तू आमच्यावर केलेल्या उपकाराला कधीही न विसरता तुझ्याच विचारांवर सर्वांनी चालावं यासाठीच हा इतका मोठा लेख लिहिलाय वाचणार्यांनी पुढचा निर्णय घ्यावा.

बा तुला, तुझ्या स्मृतीला, कार्याला, त्यागाला आणि विचारांना विनम्र अभिवादन !!

महेंद्र अशोक पंडागळे

7678044677.

टीप :

बा भीमा आता दिल्लीत शेतकरी आंदोलनात सुरू असलेल्या लढाईत जगातले सगळे योद्धे गायब झालेत आणि भारतीय विरुद्ध अभारतीय असा हा थेट लढा सुरुये जो आंबेडकरवादी विरुद्ध फॅसिस्ट Rss असा थेट आहे.