मधूमेहमुक्त भारत अभियानात सहभागी होण्याचे डॉ. दीक्षितांचे आवाहन

मधूमेहमुक्त भारत अभियानात सहभागी होण्याचे डॉ. दीक्षितांचे आवाहन


जुन्नर (लोकमराठी) : स्थूलत्व व मधूमेहमुक्त भारत अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारच्या स्थूलता विरोधी अभियानाचे ब्रँड अँबेसिडर प्रा. डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे बोलताना केले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या ९० व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन सभेत चला आरोग्यावर बोलू काही’ आपले आरोग्य आपल्या हाती या विषयावर ते बोलत होते.


त्या वेळी भीमाजी गडगे, अतुल बेनके, पांडुरंग पवार,संजय काळे, शरद लेंडे, तान्हाजी बेनके, आशा बुचके, शशी सोनवणे,उदय भोपे, गुलाब पारखे,सुमित्रा शेरकर,योगिता शेरकर, शुभांगी लाटकर, ललिता चव्हाण,राजश्री बोरकर,उज्वला शेवाळे,अर्चना भुजबळ,सर्व आजी माजी संचालक,अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


डॉ. दीक्षित म्हणाले, आधुनिक जीवनशैली मुळे निर्माण होणारा लठ्ठपणा हा आपल्या सर्व आरोग्य समस्यांचे मूळ आहे. त्यासाठी कार्बो-इन्सुलिन सिद्धांतावर आधारित उपाय केल्याने निश्चितच परिणाम होतो.वेद व आर्युवेदात देखील दोन वेळा जेवणाचा सल्ला दिला आहे. परंतु आपली अवस्था कळतय पण वळत नाही अशी झाली असून त्यावर मात करण्याची आज खरी गरज आहे. या डाएट प्लॅन मध्ये आयुष्य घडविण्याची क्षमता आहे त्यासाठी हा प्लॅन प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवून तीन महिने डाएट प्लॅन करा तुम्हीच आयुष्यभर हे अभियान पुढे सुरू ठेवाल अशी खात्री आहे.यावेळी त्यांनी वजन कमी करण्याचा साधा सोपा विनाखर्चीक उपाय समजावून सांगितले.

सुरवातीला डॉ.दीक्षित,शेरकर परिवारातील सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांना अभिवादन करण्यात आले.

सत्यशील शेरकर म्हणाले, स्व. शेठबाबांची जयंती सर्वसामान्यांसाठी एक ऊर्जास्त्रोत आहे. प्रा. डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकाने आपल्या जीवनशैलित बदल केल्यास सर्वांचे जीवन आरोग्यदायी झाल्याशिवाय रहाणार नाही.शेरकर परिवारातील सर्व सदस्यांनी डॉ.दीक्षित यांचे स्वागत केले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धाकांना डॉ.दीक्षित यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तान्हाजी बेनके,अतुल बेनके,संजय काळे,शरद लेंडे,आशा बुचके यांची भाषणे झाली.उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.