मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र

मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र

नवी दिल्ली (लोकमराठी) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

मनमोहन सिंह म्हणाले, “गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ५ टक्के होता. यातून हे स्पष्ट होते की देश मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. भारताकडे जास्त वेगाने विकास करण्याची क्षमता आहे. पण मोदी सरकारच्या अव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा ०.६ टक्के आहे. आपली अर्थव्यवस्था नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमधून अद्याप बाहेर आलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते. याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळेही अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘देशांतर्गत मागणी आणि वापराचे प्रमाण १८ महिन्यांतील सर्वाधिक कमी आहे. जीडीपी चे प्रमाण १५ वर्षांतील सर्वात कमी आहे. कर महसूल कमी आहे. लहानातल्या लहान व्यापाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांना ‘कर दहशतवादाची’ धास्ती सतावते आहे. गुंतवणुकदारांमध्ये साशंकतेची परिस्थिती आहे. अर्थव्यवस्था ज्या गर्तेत सापडली आहे, तेथून बाहेर येण्याची शक्यता आता नाही.’

एकट्या ऑटोमोबाइल क्षेत्रात साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर नोकरकपात झाली आहे, परिणामी मजुरांसमोर रोजच्या उपजिवीकेचे संकट उभे राहिले असल्याचे डॉ. मनमोहन सिंह म्हणाले. ग्रामीण भागातही परिस्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळत नाहीए आणि उत्पन्नात सतत घसरण होत आहे. मोदी सरकार कमी महागाई दराला आपलं यश म्हणवते आहे, पण यासाठी सरकारने शेतकऱ्यांची किंमत मोजली आहे, असंही सिंह यांनी लक्षात आणून दिलं.