पिंपरी, ता. २० मार्च : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या(सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकारी नियुक्त केले असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलाआहे. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – बांधकाम परवानगी सह शहर अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रिय कार्यालय – भूमि आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित राहणार आहेत.
मुख्य समन्वय अधिकारी हे सर्व नागरिकांना मागील आठवड्यात आयुक्त तथा प्रशासक यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, महाराष्ट्र शासन तसेच महानगरपालिकेच्या विविध योजना, महत्वाची परिपत्रके याविषयी माहिती देतील. तदनंतर प्रत्येक नागरिकांना दालनामध्ये बोलावून त्यांची तक्रार नोंदवून घेतील. शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिका-यांशी चर्चा करून मार्ग काढतील. मुख्य समन्वय अधिकारी हे तक्रार नोंदणी व अभिलेख जतन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील लघुलेखक किंवा मुख्य लिपिक यांना देखील सोबत ठेवतील. तक्रार निवारणासाठी जास्त अवधीची गरज असल्यास मुख्य समन्वय अधिकारी संबंधित नागरिकाला त्याची माहिती देतील आणि तक्रार विषयक नोंदणी करून आयुक्त तथा प्रशासक कार्यालयाशी संबंधित तक्रारी सहाय्यक आयुक्त (प्रशासन) यांच्याकडे पाठवतील. सदर तक्रारींविषयी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे दर मंगळवारी सकाळी १०.०० ते १२.०० मध्ये आयुक्त तथा प्रशासक कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत निवारण न झालेल्या तसेच जास्त अवधीशी संबंधित किंवा धोरणात्मक निर्णयांशी संबंधित तक्रारींविषयक बैठक आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे दर शुक्रवारी संबंधित विभागप्रमुखांसोबत आयोजित करण्यात येईल. आयुक्त तथा प्रशासक तसेच सर्व अतिरिक्त आयुक्त हे देखील दर सोमवारी – कोणत्याही एका क्षेत्रीय कार्यालयातील जन संवाद सभेत स्वतः उपस्थित राहतील.