पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२२) स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरभास्करास ”स्वर यज्ञ” या एक दिवसीय सांगीतिक महोत्सवातुन ” स्वर सुमनांजली” अर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून याचे उद्घाटन शनिवारी (दि. ९ एप्रिल) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ६ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात सलग २४ तास स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप रविवारी (दि. १० एप्रिल) सकाळी ६ वाजता होणार आहे अशी माहिती संगीत महोत्सवाचे संयोजक अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर आणि कलाश्री संगीत मंडळाचे पं. सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सोमवारी (दि. ४ एप्रिल) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र आमले, सुहास जोशी, पं. सुधाकर चव्हाण, राजेंद्र बंग, गौरी लोंढे, सुषमा समर्थ आणि चारुशिला कणगतेकर आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, ” स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आणि पिंपरी चिंचवड शहराचा अनुबंध अनेक वर्षापासूनचा आहे. पंडितजींनी शहरांमध्ये अनेक संगीत मैफली रंगविल्या आहेत. यंदा स्वरभास्कराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने सांगितिक महायज्ञ करण्याची संधी नाट्यपरिषद आणि कलाश्री संस्थेला मिळत आहे. ही भाग्याची गोष्ट आहे अशा प्रकारचा सांगितिक सोहळा प्रथमच होत आहे. औद्योगिक नगरीला सांस्कृतिक नगरी आणि सांगीतिक नगरी करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव सुवर्णपान ठरेल”
पं. सुधाकर चव्हाण यांनी सांगितले की, शास्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक, वादक आपली कला सादर करणार आहेत. तसेच शास्रीय गायन, तबलावादन, संतुरवादन, बासरीवादन होणार आहे. असा सांगितीक कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच हा कार्यक्रम होणार असून शास्रीय गायन आणि वादनातून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
पं. सुधाकर चव्हाण, सुधीर दाभाडकर, यश त्रिशरण, रईस खान, दीपक भानुसे, पंडित उदय भवाळकर, गायत्री जोशी, समीर सूर्यवंशी, पंडित रघुनंदन पणशीकर, निनाद दैठणकर, शाश्वती चैतन्य, अर्शद अली, स्मिता देशमुख, रवींद्र दामले, रामदास पळसुले, आरती ठाकुर, पंडित शौनक अभिषेकी, कल्याणी देशपांडे, संदीप गुरव, रुचिरा केदार, विराज जोशी, यशश्री सरपोतदार, सौरभ वर्तक, अर्पणा गुरव, तेजस उपाध्ये, गिरीश संझगिरी, अभय वाघचौरे, मिलिंद दाते, अजिंक्य जोशी-रोहित मुजुमदार, शिवानंद स्वामी-नामदेव शिंदे, नंदकिशोर ढोरे, सानिया पाटणकर, पं. श्रीनिवास जोशी ही मंडळी यावेळी आपली कला सादर करणार आहेत. तसेच हार्मोनियमची साथ सुयोग कुंडलकर, प्रभाकर पांडव, उमेश पुरोहित, यश खडके, उदय कुलकर्णी, माधव लिमये, गंगाधर शिंदे व तबल्याची साथ भरत कामत, नंदकिशोर ढोरे, आशय कुलकर्णी, संतोष साळवे, सचिन पावगी, पांडुरंग पवार, प्रणव गुरव, अतुल कांबळे, अमोल माळी, रोहित मुजुमदार, अजिंक्य जोशी, विष्णू गलांडे, कार्तिकस्वामी दहिफळे, गंभीर महाराज अवचार (पखवाज) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.
प्रेक्षकांनी मोफत प्रवेश पाससाठी – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह नाट्य परिषद कार्यालय सायं. ६ ते ८ (राजू बंग – 9822313066.), कलाश्री संगीत मंडळ, मधुबन सोसायटी, सांगवी सकाळी ९ ते १२, सायं. ५ ते ८ (शाम देशमुख – 8983379702.), सुषमा सायन्स सेंटर, काळेवाडी फाटा, सायं. ४ ते ७ (9765395025.) येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.